रत्नागिरी : प्रतिनिधी
एकच मिशन.. जुनी पेन्शन, बंद करा.. बंद करा.. ऑनलाईन कामे बंद करा.. अशा भरपावसात घोषणा देत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी, या मागणीकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी राज्यभरात आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
रत्नागिरीतही मोठ्या संख्येने या मोर्चाला प्रतिसाद लाभला. धो-धो पाऊस कोसळत असतानाही मोर्चाला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. शिक्षकांच्या मोठ्या गर्दीमुळे वाहनांची मोठी कोंडी झाली आणि तो सोडवताना पोलीसांची दमछाक झाली होती. शिक्षकांना शिकविण्याचे मूळ काम सोडून नको ती कामे प्रशासनाने दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामे करणार? असा सवाल शिक्षकांनी यानिमित्ताने उपस्थित केला. जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती, रत्नागिरीचे हजारो शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.