रत्नागिरी – विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारांची १३ वी यादी जाहीर करत नारायण राणे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे तब्बल ३५ वर्षांनी तळकोकणातील लोकसभेची उमेदवारी भाजपकडे आली आहे. पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात युतीमुळे ही जागा शिवसेना या मित्रपक्षाला कायम वाट्याला जात असे. भाजपचे कार्यकर्ते, मतदार युतीधर्म पाळून शिवसेनेच्या उमेदवाराला कायम निवडून आणत असत. यावेळी या युतीधर्माची पाळणुक करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे. त्यामुळे आज महायुतीचा उमेदवार म्हणून आज (१९ एप्रिल) कोकणचे नेते नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. त्यामुळे आता ठाणे, नाशिक आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना आपले उमेदवार जाहीर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होते. त्यामुळे नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. अखेर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.
कोकणचे नेते नारायण राणे यांना पाठिंबा – सामंत बंधू
राणे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेतोय. मी थांबतोय. असे ट्वीट किरण सामंत यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या एका नेत्याने याबाबतचा निर्णय थोड्या दिवसांनी घ्यावा असे म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर आमची चर्चा सुरू होती. आमची बैठक ही झाली. या बैठकीला माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतर किरण सामंत यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेण्याचा आपला निर्णय ठाम ठेवल्याचे उदय सामंत म्हणाले. मी आणि किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये म्हणून नारायण राणे उमेदवारी जाहीर झाल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे निश्चित झाले. आमच्या कुटुंबियांशीही आम्ही चर्चा केली. त्यावेळी त्यांनीही नारायण राणे यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली, असेही उदय सामंत म्हणाले.
राऊत विरुद्ध राणे सामना
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे हे आज (१९ मार्च) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता शिवसेने ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध भाजप उमेदवार नारायण राणे अशी लढत पाहायला मिळणार आहे.