पालघर : प्रतिनिधी
देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हा जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे. सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून सुमारे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने नेहमीच मोठे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा विकास ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. त्यामुळेच नुकतेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिघी येथे बंदर औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे. ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नाचे प्रतिक बनेल. या पोर्टमुळे पर्यटन व इको रिसोर्टला चालना मिळेल, असेही प्रधानमंत्री श मोदी यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे योगदान मोठे आहे. सागरी क्षेत्रातील विकासात मच्छिमार बांधवांचे योगदान आहे. 526 गावे, कोळीवाडे आणि 15 लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राचे मत्स्य पालन क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने आदिवासी तसेच मच्छिमारांसाठी वेगळे मंत्रालय निर्माण केले आहे. मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारण्याला प्राधान्य दिले असून त्यांच्या हितासाठी योजना बनविण्यात येत आहेत. मच्छिमार बांधवांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी मच्छिमार संस्था मजबूत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आज शुभारंभ केलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजना तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारून आर्थिक संपन्नता येणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.