रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी देवेंदरसिंह यांना त्यांच्या थिबा पॉईंट येथे असलेल्या निवासस्थानासमोर गेले चार महिने अंधार पडलेला दिसत नाही का? की जिल्हाधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतला आहे? जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत लावण्यात आलेले व रस्त्यावर असणारे पथदीप गेले चार महिने बंद आहेत. फक्त जिल्हाधिकारी निवासस्थान आतमध्ये जाताना गेट जवळ एक पथदीप सुरू आहे. बाकी रस्त्यावरती अंधार आणि समोर असलेल्या मोकळ्या जागेतही अंधार असतो. इथे वाहतुकीचे नियमन करायला एका पोलिसाला ड्युटी दिलेली आहे. मात्र इथे अंधार असल्याने काय कर्माची सुरक्षा करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्दामहून याकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या अंधारात नेमकं जिल्हाधिकाऱ्यांना काय साध्य करायचं आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
नगरपरिषद प्रशासनाचे पण याकडे दुर्लक्ष झालेले आहे. भागात असलेल्या कचराकुंडीत कचरा ओसंडून वाहत आहे. शिवाय परिसरात अस्वच्छता आहे. जिल्हाधिकारी येथे राहतात म्हणजे त्यांना हे दिसत नाही का की ते जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत, ते समजायला वाव नाही. काही वर्षांपूर्वी रत्नागिरीला एक मराठी जिल्हाधिकारी लाभले होते. ते पारदर्शक व्यवहार करणारे आणि स्वच्छताबाबत काटेकोर असणारे होते. मॉर्निंग वॉकला किंवा इव्हिनिंग वॉकला जाताना ते जिल्हाधिकारी कुठे कचरा साचला असेल, कुठे पथदीप बंद असतील, तर संबंधित यंत्रणेला स्वतः कॉल करून त्याबद्दल खडसावत असत. त्यामुळे रत्नागिरी शहराला आणि शहराच्या प्रशासकांना शिस्त लागली होती.
सध्याचे जिल्हाधिकारी मात्र स्वतःच जर बेशिस्त असतील तर जिल्ह्याला काय कर्माची शिस्त लावणार? स्वतःच्या बंगल्यासमोर अंधार पसरलेला असताना चार सहा महिने होऊनहीं जिल्हाधिकारी नगरपरिषद प्रशासनाला का खडसावत नाही? आणि जर खडसावले असेल तर योग्य ती कार्यवाही का होत नाही? या परिसरामध्ये पोलीस जो ठेवला आहे तो फक्त जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या जवळ १०० मीटर परिसरात गाड्या लावण्यास मज्जाव करण्यासाठी आहे का? असे असेल तर रत्नागिरीच्या सामान्य थिबापॉईंट परिसरात फिरायला यायचेच नाही का? या भागात मोकळी जागा असल्याने तिथे स्थानिक रत्नागिरीकर चालण्यासाठी आणि बाजूलाच ओपन जिमची साहित्य असल्याने तिथे व्यायाम करण्यासाठी ही येतात. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा पोलीस येथे दुचाकी लावायला मज्जाव करायला ठेवला असल्याने रत्नागिरीकरांनी जायची तरी कुठे? संध्याकाळी इथे स्थानिक रत्नागिरी कर येऊ नयेत म्हणून पथदीप आणि इथल्या भागात मुद्दामहून अंधार करण्यात तर आला नाही? अनेक सवाल रत्नागिरीकर यांच्या मनात उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जर याकडे लक्ष दिले नाही तर सामान्य जनता म्हणून यावरती आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्याचे इथले नागरिक ठरवत आहेत. त्या आंदोलनाची वाट जिल्हाधिकारी पाहत आहेत का? सवाल उपस्थित होत आहे.