रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यात महायुती असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महायुतीत अंतर्गत धूसफुस असल्याचे चित्र मुख्यमंत्री रत्नागिरीत आले असताना पाहायला मिळाले. महायुतीच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित होते मात्र महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने त्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी हे उदय सामंत यांच्या कारभारावर नाराज आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इंजीनियरिंग कॉलेजच्या नामकरण कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहिले नाहीत. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण उपस्थित राहतील याबाबतचा मेसेज भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचला. मात्र आजच्या कार्यक्रमात हे दोघे नेते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बहिष्कारच टाकला, मेसेज भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गेल्याने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. भाजपने रत्नागिरीमध्ये महायुतीतील असलेल्या संबंधांची झलक दाखवून दिली. त्याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बंटी वणजु यांनी जाहीर केले. मात्र भाजपकडून कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी जाहीर न करता प्रत्यक्षात या कार्यक्रमांना उपस्थित न राहून बहिष्कार टाकला. त्यामुळे भाजपने ‘जोर का झटका धीरे से लगे’ या उक्तीनुसार वर्तन केल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागात लाभार्थ्यांना ब्लॅकमेलिंग
माझी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते रक्षाबंधनच्या आधी लाभार्थी महिलांना मिळाले. या महिलांकडे जाऊन काही कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये ब्लॅकमेलिंग करायला लागले आहेत. तुम्ही जर मुख्यमंत्री येत आहेत त्या कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर त्या पुढचे हप्ते बंद होतील अशी भीती महिलांना घालण्यात काही कार्यकर्ते व्यस्त होते. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी काहीही करण्यासाठी कार्यकर्ते कसे सज्ज होते याचे उत्तम उदाहरण आज रत्नागिरीतील ग्रामीण भागाच्या बहिणींना दिसले. हे कार्यकर्ते शिंदे गटाचे असल्याचे काही महिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. योजना महायुतीचे असताना शिंदे गट त्यावर आपली पोळी भाजत असल्याचे भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीचा धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? सवाल काही पदाधिकारी खाजगीत व्यक्त करत आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन असे भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले होते. या कार्यक्रमांना महायुतीच्या घटक पक्षांना सामावून घेण्याचे त्यांचे धोरण होते. त्यानुसार शहरावर बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि अजित दादांचा राष्ट्रवादी पक्षाने कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहण्याचे टाळल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस यावी दिसून आली. त्यामुळे उदय सामंत यांनी केलेल्या नियोजनानुसार महाविद्यालय शाळा यांचे विद्यार्थी, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी, बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या जीवावर कार्यक्रम यशस्वी केले. मंडणगडपासून ते राजापूरपर्यंत जिल्ह्यातून शिंदे शिवसेनेची फौज या कार्यक्रमांना आणली होती. ग्रामीण भागात जाणाऱ्या सगळ्या बस सेवा बंद करून केवळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना लोक उपस्थित राहतील याची नियोजन करण्यात आले होते. एकीकडे ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्यामुळे लोकांचे शिव्याशाप आयोजकांना घ्यायला लागत होते. तर दुसरीकडे उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी, लाभार्थी, महिला यांना वेळेत नाश्ता किंवा जेवण मिळाले नाही त्यामुळे त्यांच्या नाराजीचा सूर आयोजकांना भोवणार आहे. मंडणगडातून पहाटे निघालेली लोक संध्याकाळी घरी पोचले. दापोली खेड गुहागर चिपळूण या भागातील कार्यकर्त्यांची अवस्था तशीच होती. एसटीचा खराब रस्त्यावरून प्रवास आणि पूर्ण दिवस खराब केल्याने नाराजीचे वातावरण होते. कार्यकर्त्यांना फार त्रास झाला नसला तरी जे विद्यार्थी, लाभार्थी आले होते त्यांना मनस्ताप झाला. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या म्हणजेच शिंदे गटाच्या उमेदवाराला भोगावा लागणार हे निश्चित!