रत्नागिरी : प्रतिनिधी
शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी शहरात विविध कार्यक्रमांसाठी आज येत आहेत. मात्र त्यांच्या सभांसाठी गर्दी जमवण्याचा एक नवीन फंडा अमलात आणला जात आहे. शाळा महाविद्यालयातील मुलांना या सभेसाठी उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ‘मंत्री येताहेत भेटीला, जनतेला धरलंय वेठीला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री महोदय, महिन्यातून एकदा रत्नागिरीला याच!
रत्नागिरी दौऱ्यावरती मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर ठिकठिकाणी खड्डे भरणे आणि डांबरीकरण करणे अशी कामे झटपट करण्यात आली. अनेक कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दुभाजकावरती वाढलेले झाडे व्यवस्थित छाटण्यात आली. परिसराची स्वच्छता करण्यात आली. ठिकठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यात आले. खराब असलेल्या भागाची रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय महिन्यातून एकदा रत्नागिरीला याच! किमान तुमच्यामुळे तरी रत्नागिरीचे रस्ते काही काळासाठी का होईना सुस्थितीत होतात. तुम्ही आपल्या घरी गेल्यावर परत खड्डे पडतीलच त्यामुळे महिन्यातून एकदा तुम्ही आलात पण आमचे मोडणारे कंबरडे व्यवस्थित राहील. जशी लाडक्या बहिणींची काळजी घेता तशी लाडक्या वाहन चालकांची पण काळजी घ्या!
एखाद्या कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी होत नाही म्हटल्यावर ती गर्दी जमवण्यासाठी आयोजन वाटेल त्या थराला जाऊ लागले आहेत. रत्नागिरी जिल्हा याला अपवाद नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीतील निवडणूक पूर्व विकास कामांच्या उद्घाटनासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत त्यांचे दोन कार्यक्रम होणार आहेत. त्यातील एका कार्यक्रमाला शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. रत्नागिरीमध्ये चंपक मैदान येथे माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान तर होणारच आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेला गर्दी करण्यासाठी नवनवीन फंडे तयार केले जात आहेत. कधी बचत गटांच्या महिलांना उपस्थित राहण्याची सक्ती केली जाते. कधी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना उपस्थित राहण्याची सक्ती केली जाते. अगदीच गर्दी कमी असेल तर शाळा आणि महाविद्यालय यातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनाही अशा सभांना उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात येते. यावेळी शाळा महाविद्यालयातील मुलांनी उपस्थित राहायचे आणि सभेला गर्दी झालीच पाहिजे असा जोरदार अट्टाहास सुरू आहे. ग्रामीण भागात तर ज्या महिलांना माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत त्या महिला उपस्थित राहिल्या नाहीत तर त्यांचे पैसे परत घेण्यात येतील, अशी भीती दाखवली जात आहे. त्यामुळे एकदा आलेले पैसे परत जाणार या भीतीपोटी अनेक महिला आजचा रोज सोडून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आयोजकांचे कार्यकर्ते असे महिलांना भीती दाखवून कार्यक्रमास्थळी बोलवणार असतील तर माझी लाडकी बहीण असे या महिलांना संबोधण्यात काय अर्थ आहे? बहिणच जर भीतीपोटी या कार्यक्रमाला येणार असेल तर हे ब्लॅकमेलिंग नाही का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
दरम्यान दिनांक २१ऑगस्ट आणि २२ ऑगस्ट रोजी राज्य परिवहन महामंडळातर्फे ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. ही बस सेवा बंद केल्याने ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री येणार असल्याने त्यांच्या सभेसाठी बसने विद्यार्थी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला यांना आणण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. म्हणजे सभेला गर्दी दाखवण्यासाठी विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील जनतेचे हाल करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांना हे तरी पटणारे आहे का? की मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अशी गर्दी केली जात आहे याचे उत्तर आयोजक म्हणून पालकमंत्री उदय सामंत कधी देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.