रत्नागिरी : प्रतिनिधी
महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीचे बॅनर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात लावण्याची सक्ती या योजनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत यांच्या इशाऱ्याने तालुकास्तरावरती योजनेचे सचिव तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी केली. त्या बॅनरवरती पालकमंत्र्यांचा फोटो लावण्यात आला मात्र महायुतीचे स्थानिक खासदार नारायण राणे यांचा फोटो मुद्दामहुन टाळण्यात आला. त्यामुळे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर यांनी बॅनरवर नारायण राणे यांचा फोटो लावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यांनी दिलेल्या निवेदनाला तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे दिलेल्या इशारानुसार आमरण उपोषणाला स्वातंत्र्यदिनी सुरुवात केली. जोपर्यंत बॅनर लावण्यात राजकारण करणारे अधिकारी माफी मागत नाही, तसेच सर्व बॅनर वरती खासदार नारायण राणे यांचा फोटो लावला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशा ठाम निर्धार निवळकर यांनी केला आहे.
स्वातंत्र्यदिनी उपोषण सुरू केल्यानंतर संध्याकाळी गटविकास अधिकारी निवळकर यांना भेटण्यास आले. हि योजना पालकमंत्री अध्यक्ष आणि तहसीलदार सचिव या नात्याने राबवत असतात. त्यामुळे या बॅनरचे डिझाईन आपण केलेले नाही. आता योजनेचे हप्ते येण्यास सुरुवात झाली असून ते बॅनर काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आता फोटो कसा लावणार ही विवंचना आम्हाला पडली आहे, हे गटविकास अधिकारी यांनी निवळकर यांना सांगितले. त्यावर नवीन बॅनर तयार करून खासदारांचा फोटो त्यावर उद्याच्या उद्या लावावा अशी मागणी निवळकर यांनी करत उपोषणावरती ठाम राहिले. यामागे कोण सूत्रधार आहे ते आम्हाला माहीत असून प्रोटोकॉलनुसार खासदारांचा फोटो लावायला हवा होता एवढे भान अधिकारी म्हणून तुम्हाला नाही का? असा सवाल करत निवळकर आक्रमक झाले. योजना महायुतीची असताना फक्त खासदारांचा फोटो का लावण्यात आला नाही? सूत्रधार कोण आहे? प्रशासन कोणाच्या तालावर नाचत आहे? असे एक ना असंख्य प्रश्नांचा वर्षाव करून गटविकास अधिकाऱ्यांना घाम फोडला. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी माझी लाडकी योजना अभिनंदनचे बॅनर लावून त्यावर खासदारांचा फोटो लावण्यात येण्याचे आश्वासन निवळकर यांना दिले. मात्र हे आश्वासन लेखी देऊन उद्याच्या उद्या सर्व ग्रामपंचायत मध्ये ते बॅनर लागले पाहिजेत अशी मागणी निवळकर यांनी केली तसेच जे दोषी आहेत त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे. त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी निवळकर यांनी करत उपोषण सुरूच ठेवले.