रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वातंत्र्यदिनी ८ बेमुदत आंदोलने सुरू झाली. यातील दोन आंदोलने पोलिसांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आली. मात्र सहा आंदोलने सुरूच होती. ही आंदोलने सुरू असताना या भागात दौऱ्यावर असणारे पालकमंत्री उदय सामंत या मार्गावरून चार वेळा फिरून गेले. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील उपोषणे, आंदोलने होत असताना ती तोडगा काढून मिटवता आली असती मात्र पालकमंत्री जनतेला वाऱ्यावर सोडून एसी गाडीतून फेरफटका मारत राहिले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एखादा सरकारी अधिकारी सोडला तर कोणीही या आंदोलनांच्या ठिकाणी फिरकले नाही. नियमित गराडा घालणारे पत्रकारही आंदोलनाच्या ठिकाणी गेलेले नाहीत. काही मोजके पत्रकार सोडले तर इतरांनी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याकडे दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न येथील आंदोलन कर्ते तिथे गेलेल्या पत्रकारांना विचारत होते.
जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दोन बेमुदत आंदोलने सुरू आहेत. मानधन तत्त्वावरील शिक्षकांचे शिक्षण सेवक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. माझी लाडकी योजनेच्या रत्नागिरी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनर वरती नवनियुक्त खासदार नारायण राणे यांचा प्रोटोकॉलनुसार फोटो न घेतल्याने उपोषण सुरू आहे. मुलाच्या आत्महत्या होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या संशयीतांवर गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. शिरगाव येथील एका संस्थेच्या मुजोरपणा विरोधात उपोषण सुरू आहे. ही सहा उपोषणे सुरू असताना पालकमंत्री फिरकले नाही. रत्नागिरी शहरातील अर्धवट कामांचे लोकार्पण सोहळे करण्यात ते दंग होते. निवडणुकीच्या नशेमध्ये असणारे पालकमंत्री राजेशाही थाटात होते. मात्र उपोषण करते रात्री उशिरापर्यंत उपाशी तापाशी राहिले. आज तोडगा काढून उपोषणे मागे घेण्यासाठी पालकमंत्र्यांना शक्य होते मात्र ते जनतेला उपाशी ठेवून स्वतः उद्घाटने भूमिपूजन कामात व्यस्त राहिले. आजतागायत गेल्या कित्येक वर्षांमध्ये जितके पालकमंत्री झाले ते स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी, महाराष्ट्रदिनी आवर्जून उपोषण-आंदोलनकर्ते यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत असत मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी नवा पांयडा घातला आहे.