रत्नागिरी : प्रतिनिधी
हिपॅटायटीस हा व्हायरल इन्फेक्शनमुळे पसणारा आजार असून, यामुळे लिवर सुजण्याची शक्यता असते. हिपॅटायटीस बी व सी तीव्र होऊन त्याचे रुपांतर लिवर सिरॉसिस, कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू देखील ओढवू शकतो. होय.. हिपॅटायटीस टाळता येऊ शकतो..असा फलक घेवून जागतिक हिपॕटायटीस दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय व्हायरल हीपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत रॅली काढण्यात आली. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डाॕ संजय कलकुटगी, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्ज्वलनानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा रुग्णालय रत्नागिरी अंतर्गत कावीळची मोफत तपासणी व उपचार हिपॅटायटीस बी पॉझिटीव्ह मातेच्या बाळाला जन्मानंतर 24 तासाच्या आत इन्जेक्शन एचबीआयजी देऊन, आपण संभाव्य धोका टाळू शकतो. धुम्रपान टाळा, कर्करोगास पळवा, असे फलक हाती घेऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी रॅलीत सहभागी झाले होते. जयस्तंभमार्गे मध्यवर्ती बसस्थानकाजवळ रॅली आल्यानंतर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन याठिकाणी उपस्थितांची जनजागृती केली. त्यानंतर या रॅलीचा जिल्हा शासकीय रुग्णालयात सांगता झाला. रा.भा. शिर्के प्रशालाचे विद्यार्थी, भारत स्काऊटचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी, शिक्षक आदी या रॅलीत सहभागी झाले होते.