रावणांगवाडी येथे बोगदा काढणार, उपसरपंच संजय निवळकर यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी गावातील उड्डाणपूल रद्द करावा, ही येथील व्यापाऱ्यांनी मागणी तसेच रावणांगवाडी येथे बोगदा काढावा, ही ग्रामस्थांनी मागणी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली होती. त्याचा पाठपुरावा निवळी ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि अनुसूचित जाती मोर्चा भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केला होता. त्याला यश आले असून निवळी येथील होणारा उड्डाणपूल लवकरच रद्द होणार असून रावणांगवाडी येथे नवीन बोगदा काढण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे.
निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा ही मागणी निवळीच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली खासदार नारायण राणे यांच्याकडे नुकतीच करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा उपसरपंच निवळकर यांनी माजी खासदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे सातत्याने केला होता. निवळकर हे कायमच गावच्या विकासाबद्दल तळमळीने पत्रव्यवहार करत असतात. त्याचाच भाग म्हणून गावाला वीज वितरण व्यवस्था सुरळीत होईल, असा निर्णय घेऊन वीज वाहिनी टाकण्याचे काम खासदार राणे यांनी मंजूर करून दिले. आता निवळी येथील उड्डाणपूल करण्याचे मुंबई गोवा महामार्गाच्या आराखड्यात दाखवण्यात आले होते. तसे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असते तर निवळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना तसेच स्थानिक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना व्यापार करणे जिकरीचे बनले असते.
व्यापाऱ्यांची आणि गावकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन निवळकर यांनी माजी खासदार निलेश राणे तसेच विद्यमान खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा केला. उड्डाणपूल रद्द करून त्याऐवजी रस्ता व्हावा ही व्यापाऱ्यांची मागणी आणि रावणांगवाडी येथे बोगदा तयार करावा ही गावकऱ्यांची दुसरी मागणी निवळकर यांनी केली होती. त्याशिवाय संपूर्ण गावातून चांगला सर्विस रोड असावा हेही या मागणी नमूद करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी खासदार नारायण राणे यांनी पाठपुरावा करून रावणांगवाडी येथील बोगदा मंजूर करून घेतला आहे. शिवाय निवळी बाजारपेठेत होणारा उड्डाणपूल रद्द करण्यात येणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले असून तसा पत्रव्यवहार सुरू झाल्याचे कळते. हा उड्डाणपूल रद्द होणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून याबाबत भाजपचे खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, गावचे उपसरपंच संजय निवळकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
‘दुसऱ्याने केलेल्या कामाचा भाडोत्री बाप बनू नका‘
उड्डाणपूल रद्द करण्याचे तसेच रावणांगवाडी येथे बोगदा करण्याचे काम माजी खासदार निलेश राणे आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याने नितीनजी गडकरी यांनी केले असून याबाबत कोणीही फुकटची श्रेय घेण्यासाठी येऊ नये,असा इशारावजा सल्ला उपसरपंच संजय निवळकर यांनी दिला आहे. कोणतेही काम न करता इतरांनी मंजूर केलेली कामे आपणच केली असे दाखवणारे लोकप्रतिनिधी सध्या गावागावात फिरून श्रेय घेण्याचे काम करत आहेत त्यांना निवळी उड्डाणपूल रद्द करण्याचे आणि रावणांगवाडी येथे बोगदा तयार करण्याचे काम विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले आहे हे लक्षात घ्यायला हवे. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा भाडोत्री बाप होण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असे त्या कामाबद्दल प्रतिक्रिया देताना उपसरपंच संजय निवळकर यांनी दिली.