पालकमंत्री सामंत भंपक आश्वासनापलीकडे काहीच करत नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
लांजा : प्रतिनिधी
लांजा-राजापूर तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनात पुढेपुढे करताना आपल्या सहकारी पक्षांचा विसर पडणे ही पालकमंत्र्यांची नेहमीची सवय असून निवडणुका आल्या की युतीमधील नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे घेवून खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या भंपक आश्वासनाशिवाय पालकमंत्री उदय सामंत काहीच करत नाहीत अशी टिका लांजा तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्कें यांनी पत्रकारांशी बोलताना केली. लांजा – राजापूर विधानसभा मतदारसंघावर बाहेरुन येवून कुणीही दावा करण्याचा प्रयत्न करु नये. या मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना असून ते देतील त्या उमेदवाराचे काम आम्ही मोबाईल स्वीच ऑफ न ठेवता करु, असा टोलाही अभिजित राजेशिर्के यांनी लगावला.
युती सरकाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा शुभारंभाचा कार्यक्रम नुकताच लांजा येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मात्र हा कार्यक्रम युती सरकारचा असतानाही विशेषत: या खात्याचे मंत्रिपद राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडे असतानाही स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अन्य सहयोगी पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख स्थानिक नेत्यांना जाणुन बुजून निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित यशवंतराव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर सडकून टीका करताना पालकमंत्री उदय सामंत हे आपल्या लाडक्या भावासाठी लांजा- राजापूर मतदारसंघात कार्यक्रम घेत असल्याची बोचरी टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी अजित यशवंतराव यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
याबाबत बोलताना अभिजित राजेशिर्के यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण हा संपूर्ण कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम. असल्याप्रमाणे साजरा करण्यात आला. यावेळी युती धर्माचा सोयीस्करपणे पालकमंत्र्यांना विसर पडला. युतीधर्म न पाळण्याची पालकरमंत्र्यांची ही जुनी सवय आहे. लांजा-राजापूर या दोन्ही तालुक्यातील रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन असो अन्य विकासकामांचे भूमीपुजन असो किंवा अपंगांचे साहित्य वाटप कार्यक्रम असो, सर्वच शासकीय कार्यक्रम घरगुती पातळीवर साजरे करण्यात पालकमंत्र्यांना अधिक रस असतो. मात्र आपल्याला मिळणारा निथी महायुती सरकारच्या माथ्यमातून मिळाला असल्याचा पालकमंत्र्यांना सोयीस्कररित्या विसर पडतो. पालकमंत्री निधीचे वाटप करीत असताना विविध शासकीय समित्यांचे वाटप करताना, विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना किती युतीधर्म पाळतात है सर्वश्रुत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या गोष्टी अजुन लोक आणि सहकारी पक्ष विसरलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाईनी आपले पितळ सोनं म्हणुन दाखवू नये, असा सल्ला राजेशिर्के यांनी दिला.