दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी
रत्नागिरी : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. देवतांची मंदिरे, पावनखिंडीत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाध्या यांची दुरावस्था झाली आहे. या सर्वांकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. अतिक्रमणे न हटवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शिवप्रेमी आणि निरपराध हिंदू यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, गडाची पाहणी करायला गेलेल्या शिष्टमंडळावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शुक्रवारी रत्नागिरी येथे अपर जिल्हाधिकारी एस.आर. बर्गे यांना देण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या नावे देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात अनेक आंदोलने झाली, निवेदने दिली गेली, विधानसभा अधिवेशन काळात सातत्याने हा विषय लावून धरण्यात आला, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा बैठका घेण्यात आल्या; मात्र अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने समयमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या संतापाचा उद्रेक झाला. अतिक्रमणविरोधात आंदोलन करणाऱ्या गड-दुर्ग प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावली गेली आहेत, तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करण्यात आली आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.
छत्रपती शिवरायांच्या विशाळगडाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखली गेली पाहिजे; मात्र आज गडावर पशूबळी दिला जाणे, कोंबड्या कापल्या जाणे, असे प्रकार सर्रासपणे घडतांना दिसतात. त्या विरोधात प्रशासनाने दोर्षीवर कठोर कारवाई केली आहे का? हे जनतेला समजले पाहिजे. उत्तराखंडमध्ये हल्दवानी या ठिकाणी अनाधिकृत बांधकामे तोडली गेल्यावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाचा फेसबुकवरचा एक गट मुसलमानांना नोटांची बंडल वाटतांना दिसला होता. तोच गट विशाळगडावर नोटांची बंडले वाटतांनाचा व्हिडिओ त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. याची संपूर्ण चौकशी चौकशी होण्यासाठी त्यांना तात्काळ कारवाई करून ताब्यात घेतले पाहिजे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी सर्वश्री संजय जोशी, गणेश गायकवाड, योगेश हळदवणेकर, मंगेश राऊत, चंद्रकांत राऊळ, संदीप तथा बावा नाचणकर, अधिवक्ता सचिन रेमणे, अधिवक्ता साईजित शिवलकर, सुशील ऐवळे, नारायण भुशिंगे, संजय मयेकर, निमिष भाटकर, गणेश घडशी, शिवगिरीष जाधव, परशुराम तथा दादा ढेकणे, ज्ञानेश्वर तथा भाई राऊत, सचिन गांधी, तन्मय जाधव आदी उपस्थित होते.