चाकरमान्यांचा हिरमोड, तिकिटांचा काळाबाजार चालत असल्याचा संशय
मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे २०२ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण रविवारी सकाळी सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत गणपती विशेष रेल्वे गाड्या फुल्ल झाल्याची माहिती समोर आली. अनेक प्रवासी तिकिट काढत असताना त्यांना गाड्या रिग्रेट झाल्याचा संदेश आला आहे. काही मिनिटात आरक्षण फुल्ल होत असल्याने तिकिटांचा काळाबाजार होतोय की काय असा संशय व्यक्त होत आहे.
यंदा गणरायाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोकणासाठी २०२ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकिटं फुल्ल झाल्याची माहिती समोर आली. २०२ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले. मात्र, आरक्षण सुरु होताच काही मिनिटात ‘त्या’ गाड्या फुल्ल झाल्याचे निदर्शनास आले. तर मागच्या पुढच्या तारखेची तिकिटे काढताना ‘ रिग्रेट ‘ असा संदेश झळकत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे. ट्रेन क्रमांक ०११६७ एलटीटी – कुडाळ गणपती विशेष एक्सप्रेस ४ सप्टेंबर , ५ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला रिग्रेट दाखवत आहे . तर , ट्रेन क्रमांक ०११८५ एलटीटी – कुडाळ गणपती विशेष ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर तर ट्रेन क्रमांक ०११५१ सीएसएमटी- सावंतवाडी गणपती विशेष ५ सप्टेंबर रोजी गाड्या रिग्रेट दाखवत आहे. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.





