कोकणातील ३ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या यशाबद्दल दिला आढावा
पणजी : प्रतिनिधी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख होते. त्यांनी या लोकसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका घेतली आणि या तिन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिनांक १८ जुलै रोजी गोव्यात जाऊन त्यांचे आभार मानले. आभार मानण्यासाठी रत्नागिरी – सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, मिहिर माने यावेळी उपस्थित होते.
तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली
ते म्हणाले, तिन्ही लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघानी निर्णायक भूमिका बजावली. म्हणजेच रायगडमध्ये भाजपच्या पेण विधानसभा मतदासंघाने तब्बल ५१००० हजाराचे लीड सुनील तटकरे यांना देऊन खासदार म्हणून निवडले. तटकरे यांच्या विजयात भाजपने मोठा वाटा उचलला. त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे असलेले मावळ, पनवेल आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक आघाडी घेऊन शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या विजयामध्ये निर्णायक आघाडी दिली.
यावेळी या नेत्यांनी प्रमोद सावंत यांना रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघांत निवडून आलेले नारायण राणे यांच्या सत्काराला उपस्थित राहण्याचे आमंत्रण ही दिले.