रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची आरोग्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आवश्यक व अत्यावश्यक श्रेणीतील डाॅक्टरांची संख्या गरजेपेक्षा अतिशय कमी आहे. या प्रश्नावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डाॅ. रामानंद यांच्याशी विस्तृत चर्चा करून मागणीचे निवेदन देण्यात आले. ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा शासकीय रुग्णालयात ४० डॉक्टर्सची निंतात आवश्यकता असताना केवळ २० डॉक्टर्सच्या सहाय्याने कारभार भगवानभरोसे चालू आहे. इतकेच नव्हे तर राजरोसपणे आजूबाजूच्या खाजगी रूग्णालयात रूग्णाला हलविण्याचे मार्गदर्शन इथून केले जाते. सर्वसामान्य माणूस या खाजगी हाॅस्पिटलचा खर्च पेलवू शकत नाही. अतिशय गंभीर अवस्थेतील रूग्ण तज्ञ डॉक्टरची उपलब्धता नसल्याने जिवालादेखील मुकत असून ही अतिशय निंदनीय आणि गंभीर बाब आहे. रूग्णाना रत्नागिरी, कोल्हापूरमधील खाजगी हाॅस्पिटलचे खिसे गरम करण्यासाठी तिकडे दाखल करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून या विरोधात संघर्ष करावा लागेल असे मनसेच्यावतीने प्रशासनाला खडसावून सांगण्यात आले. वेळ पडल्यास मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. दरम्यान, याचा पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालयपर्यंत करून इथल्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचे रूळावर आणू, असे आश्वासन डीन डाॅ. रामानंद यानी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष विशाल चव्हाण, राजू पाचकुडे, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, विधी जनहित जिल्हा उपचिटणीस माधवी पालकर , विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, नवनाथ साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.