सरपंचपदी दिप्ती हळदणकर यांची बिनविरोध
राजापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून नुकत्याच पार पडलेल्या कशेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सौ. दिप्ती दिपक हळदणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या सरपंच सौ. सोनाली मेस्त्री यांनी सरपंच पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी शुक्रवारी पोटनिवडणुक घेण्यात आली. यावेळी ओबीसी स्त्री राखीव सरपंचपदासाठी भाजपा कडून सौ. दिप्ती हळदणकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा नायब तहसिलदार सौ. दिपाली पंडीत यांनी सौ. दिप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
कशेळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकुण नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला ४, शिवसेना उबाठा गटाला ४ व काँग्रेसला १ जागेवर विजय झाला होता. यावेळी काँग्रेसने उबाटा गटाला साथ देत सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. सोनाली मेस्त्री तर उपसरपंचपदी नंदकुमार फोडकर यांची निवड झाली होती. मात्र आता सौ.मेस्त्री यांनी सदस्याचाच राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त राहिली. उर्वरीत ८ सदस्यांमध्ये सरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी भाजपाकडुन सौ. हळदणकर यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी उपसरपंच नंदकुमार फोडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डुकळे, अनंत फणसे, सौ. सिमा गोठणकर, सौ. पल्लवी सावरे, सौ. समिक्षा राडये तसेच माजी सरपंच दिपक हळदणकर, दिवाकर फोडकर, ग्रामसेविका सौ. लिंगायत आदी उपस्थीत होते. उपस्थीत सर्व सदस्य व मान्यवरांनी सरपंच सौ. हळदणकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, पदाधिकारी वसंत पाटील, भिकाजी फोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ. हळदणकर यांची बिनविरोध निवड पार पडली. या निवडीनंतर भाजपच्या सर्वांनीच सौ. हळदणकर यांचे अभिनंदन केले




