खा. नारायण राणे यांचा टोला : प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही
राजापूर : प्रतिनिधी
कोकणच्या आर्थिक विकासासोबत भावी पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच आहे. या प्रकल्पाला विरोध करून कोकणी जनतेचा घास हिरावू पाहणाऱ्या यापुढे थारा नाही, जे या प्रकल्पाला विरोध करतील, विरोधासाठी येतील त्यांना परत जाऊ देणार नाही, असा इशारा खा. नारायण राणे यांनी राजापुरात दिला. साडेतीन लाख हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे संपुर्ण कोकणचेच नाही तर राज्य आणि देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे. या प्रकल्पाला केवळ उध्दवमियाँचाच विरोध असल्याचा टोला लगावताना विरोध करणाऱ्यांनी कोकणी माणसाच्या भवितव्याचा, तरूणांच्या रोजागाराचा कधी विचार केलाय काय?असा सवाल खा. राणे यांनी उपस्थित केला.
मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या खा. राणे यांनी राजापूर शहर व परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. यानंतर राजापूर नगर नगर वाचनलयात आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा नेते निलेश राणे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उल्का विश्वासराव, प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, प्रदेश महिला सरचिटणीस शिल्पा मराठे, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार व पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश गुरव आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खा.राणे यांनी विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारांचे आभार व्यक्त केले.
भविष्यात आपल्याला विकास करायचा आहे असे नमूद करत विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राणे यांनी दिली. कोकणच्या विकासासाठी औद्योगिक प्रगती काळाची गरज असल्याचे नमुद करत राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पासाठी कंपनीला आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा राज्य व केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील असेही खा. राणे यांनी सांगितले. या प्रकल्पाला आता पोषक वातावरण असून विरोध नाही, याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी मी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकाराण करायचेच असेल तर लोकांच्या पोटाचे करा पक्षाचे नको असा सल्लाही त्यांनी दिला. तर जे विरोध करत आहेत त्यांचा हा विरोध तोडपाण्यासाठी असल्याचा घणाघातही खा. राणे यांनी यावेळी केला. त्यामुळे आता विरोधासाठी याल तर परत जाऊ देणार नाही असा इशारा खा. राणे यांनी दिला.
आपण राजापुरातील पूरस्थितीची पाहणी केली असून यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. तर आंबेवाडी येथील कै. वासुकाका जोशी पुलाचे कामही वर्षभरात मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पुरात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना ते नियमाप्रमाणे देण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.