रत्नागिरी : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्री यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान होते. मात्र इथे महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी कुठेच दिसली नाही. केवळ निवडणुकीत महायुती आणि विधायक कामाच्या कार्यक्रमात महायुतीची माती असे वर्तन घडत आहे. पालकमंत्री यांनी हा दूजाभाव का केला ? याचे उत्तर भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते विचारणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, राजन शेट्ये आदी उपस्थित होते.
या सगळ्यात महायुती कुठे दिसलीच नाही. भाजप आणि राष्ट्रवादी यांना या कार्यक्रमाला बोलावले नाही की भाजप आणि राष्ट्रवादीने यावर बहिष्कार टाकला, हे कळण्यास वाव नाही. मात्र संपूर्ण कार्यक्रम शासकीय असताना तो शिवसेनेचा असावा, असाच झाला. शिवसेनेच्या कार्यक्रमाला अधिकारी उपस्थित आहेत असा माहोल होता. यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कमतरता मात्र सगळ्यांना जाणवत होती. महायुती म्हणताना सर्व कार्यक्रम एकत्रित व्हावेत, असे अट्टाहास करणारे नेते या कार्यक्रमाला महायुती विसरले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान कार्यक्रम उत्तम झाला असून कार्यक्रमस्थळी फक्त महायुतीत असलेल्या बेबनावाची चर्चा सुरू होती. दरम्यान, याबाबत भाजप किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र कुणीही पदाधिकाऱ्यांनी याबद्दल अवाक्षर काढले नाही.