रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहराच्या नजीक असणाऱ्या एमआयडीसी भागात वासराचे शिर रस्त्यावर आढळल्याने सकल हिंदू समाज आक्रमक आणि संतप्त झाला आहे. पोलिसांना याबाबत फिर्याद देऊन अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवार दिनांक ७ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात बहुसंख्येने सहभागी होऊन हिंदू एकता दाखवा, असे आवाहन सकल हिंदू समाजने केले आहे. या मोर्च्यात आपण सहभागी होणार असल्याचे हिंदुत्ववादी नेते निलेश राणे यांनी जाहीर केले आहे. आता नाही तर कधीच नाही या शब्दात आपणही सहभागी व्हावे असे आवाहन निलेश राणे यांच्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या विडिओद्वारे केले आहे.
पोलिसांनी ४८ तासाची मुदत घेतली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपर्यंत आरोपींना पकडण्यात आले नाही तर रविवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवार दिनांक ७ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असे या व्हिडिओतून इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आणि आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान आहे. निलेश राणे स्वतः या मोर्चात सहभागी होणार असून हा मोर्चा मारुती मंदिर सर्कल येथून निघणार आहे. या मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्यातर्फे करण्यात आले आहे.
निलेश राणे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये एका वासराचे शिर लोकांना रस्त्यावर सापडले होते आणि त्यानंतर हिंदू समाजाने एक मोठा संघर्ष उभा केला. सातत्याने पोलिसांच्या समोर तक्रार करूनसुद्धा अजूनपर्यंत पोलिस कुठल्याच निष्कर्षवर आलेले दिसत नाही. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे की काय? कुठली एक बातमी आली की पोलिसांचं म्हणणं असा आहे की कुत्र्याने त्या वासराला फाडून खाल्लं. ही पोलिसांची कारण सोशल मिडियावर आणि डिजिटल मीडियावर ही समोर आली आहेत. जर पोलीस ही कारणे देणार असतील. तर प्रशासनाने आताच ह्या गोष्टीची खात्री करून घ्यावी. ही परिस्थिती जर हाताबाहेर गेली तरी त्याला जबाबदार प्रशासन असेल. कोणाला शोधलं, काय केलं? ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही विषय आहे, तपशील आहे तो तुम्ही आम्हाला द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली आहे. त्यावेळी मोर्चा काढून त्यात स्वतः सहभागी होणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले.