रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आलेली आहे. गुगल प्ले स्टोअर वरून ‘नारीशक्ती दूत’ नावाचे ॲप डाऊनलोड करून, त्यामधून लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. दिनांक १ जुलै ते १५ जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.
राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा हा या योजनेचा उद्देश आहे. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु.१५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे ही अट आहे.
आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
- अधिवास प्रमाणपत्र/ जन्म दाखला.
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला.
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- रेशनकार्ड.
- अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.