रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी डबकी तयार झाल्याने इथल्या विकासाचे ढुंगण उघडे पडले आहे. गेल्या वीस वर्षात इथले रस्ते निकृष्ट करण्यात आमदार उदय सामंत यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांनी धन्यता मानल्याने नव्याने केलेल्या रस्त्यावर डबकी तयार होत आहेत. यावर कोणताही पक्ष आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहराला सगळ्यांनी वाऱ्यावर सोडले की काय? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
दरवर्षी पावसाळा आला की अचानक रस्त्यावर डांबर टाकण्याचे प्रयोग केले जातात. ही कामे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केलेली असतात. त्यामुळे त्यांनी या कामातील निकृष्टपणाकडे लक्ष द्यायला हवे. इथली रस्त्याची कामे दर्जेदार व्हावीत, ही सामान्य रत्नागिरीकरांची मागणी असते. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी आठ दिवस काम सुरू करायचे आणि पावसात त्यावर खड्डे पडतील याची तजवीज करायची हा शिरस्ता गेल्या वीस वर्षात बनला आहे. शिवाय नव्याने केलेल्या रस्त्यावर पाणी योजनेच्या बोगसगीरीमुळे खोदाई करण्याचे प्रताप नगर परिषद बांधकाम आणि पाणी विभाग करत असतो. त्यामुळे आधीच रस्त्यात खड्डे त्यावर नगर परिषदेचे खड्डे असले उद्योग सुरू आहेत. याला नगर परिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी जबाबदार आहेत.
रत्नागिरी शहरात सन्मित्र नगर भागातील ओसवाल नगरकडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर पाणी साचण्याची व्यवस्था ठेकेदाराने केली आहे. हा रस्ता बनवताना त्याची रुंदी इस्टीमेटनुसार नाही. शिवाय त्यावर करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्याच्या बाजूला गटार आहे. परंतु त्यातून रस्त्यावरील पाणी जाईल अशी व्यवस्था नाही. गटारांची ही स्थिती संपूर्ण शहरात आहे. गटारातून पाणी जाणार नाही, रस्त्यावर पाणी साचेल आणि खड्डे पडतील, पुन्हा नवीन ठेका मिळेल आणि पुन्हा डांबरीकरण करता येईल, अशी व्यवस्था आहे.
शहरातील गोगटे जोगळेकर कॉलेजकडे जाताना जिजीपीएस समोर रस्त्यावर पावसाचे पाणी साचून डबके तयार होते. पुढे असलेल्या रिक्षा स्टँडनजिक खड्डे पडले आहेत. शिवाय लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या नजिक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तिथून एलआयसीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. शिवाय जयस्तंभ येथे उदय सामंत यांच्या कार्यालयाच्या समोर खड्डे आहेत. आठवडा बाजार, काँग्रेसभवन, मांडवी, मारुती मंदिर, हिंदू कॉलनी भाग, स्टेडियम मागचा भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डे पडलेल्या रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यावर कोणताही पक्ष आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहराला सगळ्यांनी वाऱ्यावर सोडले की काय? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.