मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्यावतीने जम्मू काश्मीरमध्ये लवकरच ‘महाराष्ट्र सदन’ उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २.५० एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. ही अडीच एकर जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
जम्मू काश्मीर सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधण्यात येणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरुपाचे असावे, त्यामध्ये कोण-कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु असल्याचं चव्हाण म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष ‘महाराष्ट्र सदन’ उभारणीच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर कश्मिरमध्ये लवकरच ‘महाराष्ट्र सदन’ उभे राहिल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी जम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यात २.५० एकर जागा महाराष्ट्र सरकारला दिली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-कशिमर सरकारच्या वतीने पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली. जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकारचे सदन बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.





