रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवित मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत (world champiyanship) कौतुकास्पद कामगिरी केली. ही स्पर्धा झेंगझोऊ, चीन येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५२ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते.
ही स्पर्धा लहान वयोगट, कनिष्ठ, वरिष्ठ, मास्टर्स अशा एकूण बारा वयोगटात घेण्यात आली. त्यामध्ये वैयक्तिक, सांघिक आणि रिले प्रकारात स्पर्धांचा समावेश होता. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे भारताच्या २२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार येथील खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये भारतातील २२ खेळाडू सहभागी झाले होते व त्यातील ७ खेळाडू हे एकच जिल्ह्यातील, एकाच स्विमिंग ग्रुपमधील असून करण मिलके, तनया मिलके, आर्यन घडशी, आयुष काळे, निधी भिडे, कार्तिकी भुरवणे, मीरा भुरवणे असे (महेश मिलके स्विमिंग) ग्रुप चे हे खेळाडू होते. करण महेश मिलके याने भारतासाठी रौप्य पदक प्राप्त करत जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावले. तसेच जागतिक स्तरावर तनया मिलके (९वा क्रमांक), आयुष काळे (१७ वा क्रमांक ), निधी भिडे (१३वा क्रमांक ), कार्तिकी भुरवणे (१९वा क्रमांक ), मीरा भुरवणे (४था क्रमांक )प्राप्त केला.
या खेळाडूंना महेश मिलके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्पर्धेआधी ३ दिवस पनवेल येथे कॅम्प घेऊन भारतीय संघांचे प्रशिक्षक वैभव चाफेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी विजेत्या संघाचे जल्लोषात स्वागत करीत सर्व विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा संध्या पालिकर यांनी ही विजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या.तसेच गोआ सरकारने पदक विजेता खेळाडूनचे मोठे जाहिरात फलक लाऊन अभिनंदनाचा वर्षाव केला.
आधुनिक पेंटॅथलॉन हा एक ऑलिम्पिक खेळ आहे आणि त्याचे उप-खेळ जगभरात खेळले जातात. हा खेळ अतिशय साहसी असून तो खेळाडूची शारीरिक आणि मानसिक चाचणी घेतो. त्यात पोहणे, इपी फेन्सिंग, अडथळे, धावणे आणि नेमबाजी यांचा समावेश आहे. बायथलॉन, ट्रायथलॉन आणि लेझर-रन हे या खेळाचे उप-खेळ आहेत.
“आधुनिक पेंटॅथलॉन आणि त्याचे उप-खेळ भारतात खूप लोकप्रिय होत आहेत” असे सांगून संध्या पालिकर यांनी भविष्यात भारत यामध्ये चमकदार यश मिळवेल असा विश्वासही व्यक्त केला आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीसारख्या छोट्या जिल्ह्यातून वर्ल्ड चैंपियनशिप मध्ये पदक मिळवणारा बहुतेक पहिलाच खेळाडू असेल. या सर्व खेळाडू व प्रशिक्षक महेश मिलके यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.