रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी
सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकारी संस्था अधिक सक्षम आणि व्यावसायिक दृष्ट्या मजबूत होणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी ‘सहकार कार्यकर्ता प्रशिक्षण’ या विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दिनांक ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण (ता. चिपळूण)’ येथे पार पडणार आहे. या प्रशिक्षणाचे शैक्षणिक संचलन सहकार क्षेत्रातील नामांकित संस्था ‘डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रबंध संस्थान, पुणे’ यांच्याद्वारे केले जाईल.
आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे मिळणार धडे : राज्याच्या पतसंरचनेत जिल्हा बँका व सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार सहकारी संस्थांच्या संचालकांना आणि कार्यकर्त्यांना सहकार कायदा, वित्तीय व्यवस्थापन, संचालक मंडळाची कार्यपद्धती, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि लेखापरीक्षण (ऑडिट) यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची माहिती असणे आवश्यक आहे.तसेच आजच्या तरुणांना सहकाराचे महत्त्व कळावे, सहकारातून नवीन तरुण नेतृत्व पुढे यावे आणि त्या माध्यमातून ग्रामीण व कृषी क्षेत्राचा विकास व्हावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरात सहकार क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, बँक व्यवसाय आणि विकास यावर तज्ज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन केले जाईल.
दि.२८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन : या निवासी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुक सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी आपले प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना व इतर सविस्तर माहितीसाठी संबंधित तालुक्यातील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात किंवा मुख्य कार्यालयातील (रत्नागिरी) प्रशासन विभागाशी संपर्क साधावा. पूर्ण भरलेले अर्ज दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना संस्थेमार्फत अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.




