रत्नागिरी : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभरात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातही या आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे. बीएलओ घरोघरी जाण्याऐवजी शहरात ठिकठिकाणी एकाच जागी ठाण मांडून बसले असून, मतदारांनाच आपल्या भेटीला बोलवत आहेत. बीएलओंच्या या मनमानी कारभारामुळे अनेक नागरिक मतदार यादीतून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
आश्वासने हवेतच विरली; अधिकाऱ्यांची मनमानी
प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच मोहिमेची घोषणा करताना बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करतील आणि माहिती गोळा करतील, असे स्पष्ट केले होते. नागरिकांनीही या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर हे अधिकारी मतदारांच्या घरी न जाता एकाच ठिकाणी बसून काम करत आहेत. बीएलओ शहरात नेमके कुठे बसले आहेत, याची कोणतीही पूर्वकल्पना किंवा साधी माहितीही मतदारांपर्यंत पोहोचत नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे.
राजकीय नेत्यांची मध्यस्थी, मतदारांना मनस्ताप
बीएलओ शहरात आल्याची माहिती मतदारांना नसल्यामुळे अखेर राजकीय पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी यात मध्यस्थी करत आहेत. “बीएलओ अमुक ठिकाणी बसले आहेत,” अशी माहिती देऊन लोकप्रतिनिधी मतदारांना बोलावून घेत आहेत आणि त्यांना अर्ज भरून आणण्यास सांगत आहेत. प्रशासकीय अधिकार्यांनी घरोघरी जाऊन काम करणे अपेक्षित असताना मतदारांनाच हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अनेकांची नावे यादीतून गायब होण्याची भीती
सध्या बीएलओंकडे असलेल्या मतदार यादीमध्ये आधीच अनेक नागरिकांची नावे नसल्याची बाब समोर येत आहे. जर अधिकार्यांनी घरोघरी जाऊन प्रामाणिकपणे तपासणी केली, तरच मतदार यादी अचूक होऊ शकते. मात्र, वरिष्ठांच्या सूचनांकडे कानाडोळा करून स्वतःच्या मर्जीने काम करणार्या बीएलओमुळे रत्नागिरीतील मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकारामुळे अनेक पात्र मतदार या पुनरीक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांनी या मनमानी कारभाराकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि मोहीम काटेकोरपणे राबवावी, अशी मागणी रत्नागिरीतील सजग नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.





