मुंबई : प्रतिनिधी
आता देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होत आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूर, दृश्य, बातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. याकामी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.
मतदान दिनी तसेच मतदानाच्या एक दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्त्वाच्या घटना, आचारसंहितेचा भंग, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत तत्काळ दखल घेतली जात आहे व त्याबाबतचा कृती अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येत आहे.
राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्षची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सह सचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक डॉ.राहुल तिडके, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवी, क्षेत्रीय कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.