राजापूर : विशेष प्रतिनिधी
महायुतीच्या माध्यमातून कोकणातील सहा लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपात तीन जागा शिवसेनेकडे (शिंदे गट )दोन जागा भाजपा तर एक जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आमचे सारेकाही सुरळीत सुरु असताना दुसरीकडे पायाखालची वाळू सरकू लागल्याने उबाठा गटाकडून कोकणातून धनुष्यबाण गायब झाल्याचा अपप्रचार सुरु असल्याची टिका भाजपचे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परीषदेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा तगडा चेहरा पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे आहे. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी कोणता चेहरा आहे ते तत्यांनी दाखवावा, असे आव्हान देताना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. २६ एप्रिलला राजापूर तालुक्यात आडीवरे आणि पाचल येथे जाहीर सभा होणार असल्याचे भाजप लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून दोन्ही बाजुनी प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापूरातील पक्ष कार्यालयात महायुतीची पत्रकार परीषद घेऊन महाविकास आघाडीसह शिवसेना उबाठा गटावर जोरदार टिका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील दहा वर्षांच्या कालखंडात देशात असंख्य विकासकामे मार्गी लागली आहेत. त्या कामांच्या जोरावर ते तिसऱ्या वेळी पंतप्रधान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंतप्रधान पदासाठी मोदींसारखा तगडा चेहरा आमच्याकडे आहे. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी कोणता चेहरा आहे ते त्यांनी दाखवुन द्यावे, असा सवाल प्रमोद जठार यांनी केला. एकीकडे कॉंग्रेस आपल्या जाहीरनाम्यात तीन लाख लोकाना रोजगार देण्याचे आश्वासन देत असतानाच त्या कॉंग्रेसच्या पाठींब्यावर या लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत मात्र आपल्या मतदारसंघात आलेल्या प्रकल्पाना विरोध करुन ते घालवुन देण्याची भूमिका घेत आहेत. त्याचवेळी उबाठाचे आमदार राजन साळवी व कॉंग्रेसच्या माजी विधानसभा सदस्या ॲड हुस्नबानू खलिफे यांचा रिफायनरी प्रकल्पाला पाठींबा राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसत नसून ती महाकन्फुजन आघाडी असल्याची खिल्ली जठार यांनी उडविली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे त्याच सावरकरांवर सातत्याने टिका करणाऱ्या राहुल गांधीना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणायचे या उबाठा गटाच्या दुटप्पी भुमिकेचीही त्यांनी चिरफाड केली.
महायुतीत सारे सुरळीत असताना दुसरीकडे विरोधक मात्र अपप्रचार करीत असुन त्यांचे मनसुबे सुज्ञ मतदार कधीच यशस्वी होवू देणार नाहीत असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे केंदात मंत्री आहेत. निवडणुक निकालानंतर ते निश्चीत खासदार बनतील यात अजिबात शंका नाही. त्यांना पुन्हा केंद्रात मंत्रीपदाची निश्चीत संधी मिळेल व या मतदारसंघाचा रखडलेला विकास नव्या जोमाने सुरु होईल असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जठार यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगरसेवक सौरभ खडपे, आरपीआयचे राजन बेतकर यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी आडिवरे, पाचल येथे प्रचार सभा
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (२६एप्रिल) राजापूर तालुक्यात सकाळी अकरा वाजता आडीवरे येथे तर सायंकाळी पाच वाजता पाचल येथे सभा होणार असून त्या सभेला महायुतीचे उमेदवार नारायण राणे, शिवसेनेचे (शिंदेगट )नेते किरण सामंत राष्ट्रवादीचे या लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अजित यशवंतराव, आरपीआयचे राजन बेतकर यासह महायुतीचे नेते उपस्थित रहाणार असल्याची माहिती जठार यांनी दिली.