रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे प्रथमच रिंगणात असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांची १३७ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आहे. स्वतःसह पत्नी नीलम राणे आणि कौटुंबिक मिळून मालमत्ता त्यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये नारायण राणे यांची वैयक्तिक मालमत्ता ३५ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. राणे यांच्यासह पत्नी व कुटुंबीयांवर सुमारे २८ कोटींचे कर्ज आहे.
शपथपत्रामध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात ४९ लाख ५३ हजार २०७ रुपये आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८७ लाख ७३ हजार ८८३ रुपये आहे. कौटुंबिक उत्पन्न १५ लाख ७ हजार ३८० रुपये आहे. नारायण राणे यांच्याकडे एक कोटी ७६ लाख ९६ हजार ५३६ रुपयांचे २५५२.२५ ग्रॅम सोने, तर ७८लाख ८५ हजार ३७१ रुपयांचे डायमंड आहेत. नीलम राणे यांच्याकडे एक कोटी ३१ लाख ३७ हजार ८६७ रुपयांचे १८१९.९०ग्रॅम वजनाचे सोने आहे. १५ लाख ३८हजार ५७२ रुपयांचे डायमंड आणि ९ लाख ३१ हजार २०० रुपयांची चांदी आहे. सोने-चांदी डायमंड असे करून कुटुंबाकडे ९ कोटी ३१ लाख ६६ हजार ६३१ रुपयांचा किमती एवज आहे.
पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवलीतील जानवलीमध्ये जमीन आहे, तर कणकवलीतील बंगला आहे. ही सर्व ८ कोटी ४१ लाख ४५ हजार ३३७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नीलम राणे यांच्याकडे पनवेल, जानवली, मालवणमध्ये गाळे, पुण्यात ऑफिस, मुंबईत फ्लॅट अशी सुमारे ४१ कोटी १ लाख ८२,७६५ रुपयांचे स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या नावावर विविध बँकांमध्ये १२ कोटींचे बँक डिपॉझिट, तर नीलम राणे यांच्या नावावर सव्वा दोन कोटींची बँक डिपॉझिट आहेत.
दरम्यान, सहा वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात उमेदवारांमध्ये नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात ८८ कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे गेल्या सहा वर्षात त्यामध्ये ४९ कोटींची वाढ झाली आहे.