रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आचारसंहिता ही लागू झाली आहे. त्यामुळे कोण लढणार कोण लढणार नाही याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आम आदमी पक्ष राज्यांमध्ये निवडणूक लढणार नाही असा एक संभ्रम निर्माण करण्यात आला होता. मात्र काही निवडक जागी सर्वशक्तीनिशी लढण्यास राज्य समितीने हिरवा कंदील दिला असल्याचे आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी सांगितले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, रत्नागिरी आणि राजापुर या जागा लढविण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्तरावर काही समाजमाध्यमांवर आम आदमी पक्ष राज्यातील निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त पसरवले जात आहे. परंतू अशाप्रकारचे कोणतीही सुचना राज्याला प्राप्त झालेली नाही. काही निवडक जागी सर्वशक्तीनिशी लढण्यास राज्य समितीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे रत्नागिरीतून श्री. ज्योतीप्रभा पाटील, गुहागरमधुन श्री. सुनिल कलगुटकर व राजापूरमधुन जिया मुल्ला हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी दिली आहे.