राजापूर : प्रतिनिधी
गेल्या पंधरा वर्षात विकासात्मक कोणतेही काम न केल्याने नैराश्य आलेले उबाठा गटाचे आमदार राजन साळवी हे आपणावर आपल्या कुटुंबावर वैयक्तिक टिका करत आहेत. माझ्या वडिलांच्या ठेकेदारीचा व्यवसाय आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे. मात्र ठेकेदारांच्या जीवावर राजकारण करून ठेकेदारांकडून पैसे कमावणे हा गुन्हा आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला. आम्ही जे काही निर्माण केले ते आमच्या व्यवसायातून केले. मात्र ज्यांचा काहीच व्यवसाय नाही त्यांचे बिअरबार कसे उभे राहतात? असा परखड सवाल सामंत यांनी केला. आपल्याकडे भरपूर मसाला आहे तोंड उघडले तर पळताभुई थोडी होईल आणि शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले आणि संजय शिरसाट याना समोर आणलं तर पुरते उघडे पडाल असा गर्भीत त्यांनी दिला. जे दहा वर्षात गंगातिर्थाचा वाद सोडवू शकले नाही ते विकास काय करणार? असा चिमटाही त्यांनी काढला.
राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तसेच कोदवली येथील नवीन धरणाच्या उर्वरीत कामाचे भूमीपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार अड. सौ. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अड. जमीर खलिफे आणि माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत उपस्थित होते. यावेळी ना. सामंत बोलत होते.
ना. सामंत पुढे म्हणाले, खोटं बोला पण रेटून बोला आणि बॅनरबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा महाराष्ट्रात जर नंबर काढायचा असेल तर त्यात राजापूरच्या लोकप्रतिनिधीचा नंबर येईल. खोटी बॅनर बाजी करून श्रेय मिळत नाही तर त्यासाठी फिल्डवर उतरून काम करावे लागते तर जनता तुम्हाला आपलं मानते असा टोलाही ना. सामंत यांनी लगावला. रत्नागिरी जिल्हयाच्याच नाही तर कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी आपण काम करत असून भविष्यात रत्नागिरीप्रमाणेच राजापूरसह खेड चिपळूण या नगर परिषदांना भरघोस निधी देवून त्यांचा कायापालट करू, अशी ग्वाही ना. सामंत यांनी यावेळी दिली.
मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी या दोन्ही पाणीपुरवठा योजनांची माहिती देत शहराच्या विविध विकासकामांसाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले तर या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे तीस कोटी तर कोदवली येथील नविन धरणाच्या वाढीव कामासाठी ८ कोटी १८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
संकुचीत मानसिकतेमुळे गेल्या दहा वर्षात राजापूरचा विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे आम्ही राजापूर लांजाकडे विशेष लक्ष पुरविलेले असून मानसिकता असेल तर काम उभं राहू शकते. याचे उदाहरण म्हणजे राजापूर शहरवासियांसाठी होत असलेली ही विस्तारीत नळपाणी पुरवठा योजना आणि नव्या धरणाचे काम असून या योजनेच्या राजापूर वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागून भविष्यात आता चौवीस तास पाणी उपलब्ध होवू शकेल तर पुढील वर्षी रत्नागिरीप्रमाणे राजापूरात कॅशलेस हॉस्पीटल उभारले जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केली. तर भविष्यात रत्नागिरी प्रमाणे राजापूर लांजाचा जोमाने विकास केला जाईल, अशी ग्वाही ना. सामंत यांनी दिली.