राजापूर : प्रतिनिधी
राजापुर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांचा जलवा पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात पायाला भिंगरी लावून महायुतीचा झेंडा घरघरात पोहचविण्यात सामंत यशस्वी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून मागील अनेक दिवसांपासून पक्षप्रवेशांचा जोरदार धडाका लावलेल्या शिवसेनेने मंगळवारी तालुक्यातील ठाकरे गटाला भगदाड पाडले. उबाठा गटाचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, जीपच्या माजी महिला बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर या पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिकांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नसिंधू समृद्ध समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेमध्ये तुम्हा सर्वांना मानाचे स्थान दिले जाईल. कोणाचीही परवड होणार नाही असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांनी दिला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर प्रकाश कुवळेकर यांच्याकडे जिल्हा संघटक म्हणून तर अन्य काहींच्या संघटनात्मक पदी नियुक्ती करण्यात आल्या.
उबाठाचे माजी तालुकाप्रमुख, राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि उबाठाचे विद्यमान विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गणेश तावडे, माजी जिप सभापती आणि त्या पक्षाच्या विद्यमान उपजिल्हाप्रमुख सौ दुर्वा तावडे,कोदवली जिप गटाच्या माजी जिप सदस्या श्रीमती योगीता साळवी,जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर, किरण तुळसवडेकर, अंकुश ऐनारकर,जितेंद्र तुळसवडेकर यासह राजापूर तालुक्यातील उबाठा गटाच्या असंख्य आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.त्या सर्वांचे शिवसेनेत जोरदार स्वागत करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून ओरिजनल शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सातत्याने खिंडार पाडण्याचे काम चालवले असून राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राजापूर तालुक्यासह लगतच्या लांजा तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणावर उबाठा सेनेचे पदाधिकारी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. मंगळवारी मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा राजापुरात पार पडला. राजापूर शहरातील आंबेडकर भवन येथे आयोजीत पक्ष प्रवेश सोहळ्याला रत्नसिंधू समितीचे सदस्य किरण सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये शिवसेनेने उबाठाला मोठे भगदाड पाडले. राजापूर तालुक्यासह राजापूर शहरातील उबाठाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.




