रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्याच्या महायुतीत मिठाचा खडा पडण्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून झाली असून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजपचे नेते तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम १४ वर्षे रखडले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मंत्री पदावर राहण्याची लायकी नाही अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार वार केला. त्याला उत्तर देताना रामदास कदम यांचे थोबाड फोडण्यात येईल, असा पलटवार बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावरून रामदास कदमांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केलं. त्यामुळे महायुतीतील वाद थेट मुद्यावरून गुद्यावर पोहोचला आहे. रामदास कदमांच्या विधानांमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अर्थात हि ठिणगी काही पहिल्यांदाच पडतेय असं नाही. सत्तेत असलेल्या महायुतीत मागील काही दिवसांपासून हे वारंवर घडत आहे. त्यामुळे पहिला प्रश्न महायुतीत खरंच सारं आलबेल आहे का? असा निर्माण होतो आहे. कदमांच्या विधानानंतर रवींद्र चव्हाण यांनी थेट रस्त्यावर समोरासमोर येण्याची भाषा केली.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून, तर कधी विकासकामांच्या मुद्यावरून रामदास कदमांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दापोली दौरा रामदास कदम यांच्या जिव्हारी लागला होता. आपला मुलगा योगेश कदम यांच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी परस्पर विरोधी काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी लगावला होता. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला जागा न सोडल्यामुळे रामदास कदम यांनी थेट नाराजी व्यक्त करत भाजपावर टीका केली होती. प्रादेशिक पक्ष संपवून फक्त भाजपलाच मोठे व्हायचं आहे का? असा सवाल त्यांनी भाजपला केला होता. २००९ सालात गुहागरचे भाजपचे बंडखोर उमेदवार विनय नातू यांच्यामुळे झालेला पराभव रामदास कदम यांच्या आजही लक्षात आहे. तर त्यामुळेच रामदास कदम आणि विनय नातू यांच्यातला स्थानिक स्तरावरचा संघर्ष वारंवार पहायला मिळाला आहे. डॉक्टर विनय नातू यांना गुहागरमधून विधानसभेची सीट दिल्यास आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये विनय नातू यांना निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशारा रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संबंध राजकीयदृष्ट्या चांगले नाहीत. तर स्थानिक पातळीवर कोकणात देखील रामदास कदम आणि दापोली भाजप यांच्यामधला संघर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये देखील वारंवार पहायला मिळाला आहे.
काय चाललय काय? महायुतीबाबत काही गंभीर प्रश्न नक्कीच निर्माण होतात.महायुतीत खरंच सर्व काही आलबेल आहे का? लोकसभेत भाजपच्या जागा कमी याचं शल्य आहे का? महायुतीतील वादाचा परिणाम मतदारांवर होणार का? स्थानिक पातळीवर सुरू असलेलं राजकारण युतीसाठी मारक आहे का? दुखवलेली मनं जवळ येतील का? विधानसभा निवडणुकीमध्ये मित्र पक्ष मनापासून काम करतील का? सध्या सुरू असलेले वाद विधानसभेपूर्वी थांबतील का?
रामदास कदम :- १४ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम चालू आहे. गेली १४ वर्ष कोकणवासीयांना वनवास बघावा लागतोय. प्रभू रामचंद्राचा वनवास संपला. तरी आजही आम्ही मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करू शकत नाही, अशी अवस्था आहे. मागच्या वर्षी रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिलं होतं, पुढच्या वर्षी गणपतीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. डिसेंबर महिन्यात दोन्ही महामार्गाचे रस्ते सिमेंटचे बनवले जातील. महामार्ग आजही पूर्ण होऊ शकला नाही, याचं दु:ख आम्हाला आहे’, असं रामदास कदम म्हणाले. काल मी ठाण्याला गेले होतो. अनेक कोकणवासीयांनी मला विचारलं की आम्ही प्रवास कसा करायचा? आमची सत्ता असूनही नाईलाज असल्यामुळे आम्हाला कोकणवासीयांना सांगावं लागतंय की हा मंत्री कुचकामी आहे. हा मंत्री बनायच्या लायक नाही, हा नालायक आहे. दुसऱ्या चांगल्या माणसाला जबाबदारी द्या मुंबई-गोवा महामार्गाचं’, अशी टीका रामदास कदम यांनी पुन्हा एकदा केली आहे. समृद्धी महामार्ग तीन वर्षांमध्ये होऊ शकतो मग मुंबई-गोवा हायवे १४ वर्षात का होऊ शकत नाही? हा नालायक माणूस मुंबई-गोवा महामार्गाबद्दल विचारलं तर उत्तर देत असेल, हा मेंढक झालाय हा पागल झालाय, मला कल्पना आहे. मुंबई-गोवा हायवेचं काय करणार आहे, याचं उत्तर शासनाने द्यावं. मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार तिघांनी पनवेल पासून गोव्यापर्यंत प्रवास करून दाखवावा. हेलिकॉप्टरने पाहणी करू नका! रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा!
रवींद्र चव्हाण :- रस्ते खातं गडकरींकडे, कदमांना माहित नाही का? मलाही बोलायला येतं. बोलायला समोरासमोर या. कोणीही वाचवायला राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा, कशा भाषेत बोलतात ते दाखवतो. रवींद्र चव्हाण आहे मी. रवींद्र चव्हाणांसारखं उत्तर देऊ शकतो. पण मी युती धर्म पाळतो. याचा अर्थ नाही की कोणीही काहीही बोलेले आणि मी ऐकून घेईल. होणार नाही असं. तोंड सांभाळून बोला. तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. ते अडाणी आहेत. त्यांना प्रश्न समजत नाही. हा नॅशनल हायवे आहे. तो नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येतो. पण ते अडाण्यासारखं उत्तर देत आहेत. त्यांच्या बाजूला बसून टाळ्या वाजवणारे हे पंधरा वर्षे मंत्री होते. तीस वर्षे शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होताना काय उपटले? तो अडाणी माणूस आहे. मला त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही. मात्र, त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले. त्यामुळे त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कधीतरी रस्त्यात समोरासमोर आल्यावर कशा भाषेत मला बोलता येतं, हे दाखवेनं. त्यावेळेला कोणी वाचवायला राहणार नाही, हे लक्षात ठेवा. युतीधर्म पाळतोय याचा अर्थ कोणीही काही बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही. तोंड सांभाळून बोलले नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही.
रामदास कदम :- रवींद्र चव्हाण यांची औकात काय? मला आव्हान देण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्ग करून घे. तू कुचकामी आहेस. गेल्यावर्षी तुम्ही शब्द दिला होता. गणपती उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही असं म्हटलं होतं. त्याचं काय झालं? मुद्द्यावर बोल. रस्त्यावरच्या गुंडासारखं बोलू नको. हिंमत असेल तर मुंबई-गोवा रस्त्यासाठी काय करणार हे बोल ना? दाऊदही थकला माझ्यासमोर. तू किस झाड की पत्ती आहेस? मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जे खड्डे पडले आहेत, त्याकडे मी त्यांचं लक्ष वेधलं आहे, असं सांगतानाच रविंद्र चव्हाण वेडा झाला आहे. मी दाऊदला घाबरत नाही, तर रवींद्र चव्हाण कोण आहेत? रवींद्र चव्हाण यांनी काहीही विकासकाम केले नाही. रवींद्र चव्हाण यांना युती तोडायची आहे. रवींद्र चव्हाण युतीच्या आमदारांना मदत करत नाही. रामदास कदमचं थोबाड फोडायला त्याला १०० जन्म घ्यावे लागतील, त्यांना माहीत नाही अजून. त्याला कल्पना नाही याची. हा कानफाडीत देण्याच्या गोष्टी करतो. याची औकात आहे काय? अशी माणसं भरपूर पाहिलीत. भौंकनेवाला कुत्ता कभी काटता नही याची मला जाणीव आहे. अशा भुंकणाऱ्या कुत्र्यावर लक्ष द्यायला मला वेळ नाही. त्यांनी कोणत्या रस्त्यावर कुठे आणि किती वाजता यायचं मला सांगावं. तिथे येतो. तू एका बापाचा असशील तर ये तिथे. दाखव. तुझं आव्हान स्वीकारायला तयार आहे. एका मंत्र्यांच्या तोंडी तोडाफोडीचा भाषा शोभत नाही.
देवेंद्र फडणवीस :- रामदास कदम हे वरिष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यांचा स्वभाव आक्रमक आहे. परंतु, मागील कित्येक दिवसांपासून वारंवार ते भाजपाला बोलत आहेत. हे आम्ही ऐकलं आहे. परंतु हे आम्हाला मान्य नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहोत. जे वाद असतील ते अंतर्गत वाद मांडा. पण असे उघडपणं एखाद्या मंत्र्यासोबत आव्हानात्मक भाषा वापरणं किंवा इशारा देणं योग्य नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बसून चर्चा करणार आहोत. जो काय वाद असेल, त्यावर चर्चा करू. वाद सोडवू.