रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिक्त १७९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवणार असल्याचे बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले असले तरी ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेचा पॅटर्न पाहता परीक्षा घेताय की मस्करी करत आहे असे विचारले वाचून कुणालाही राहवले जाणार नाही. बँकेने परीक्षेचा पॅटर्न ऑनलाइन ठेवला असून त्या पॅटर्नकडे पाहता सहा गुणांच्या सहा प्रश्नांची एका मिनिटात उत्तरे द्या आणि नोकरीसाठी पात्र व्हा, अशी गमतीशीर प्रक्रिया पार पडणार आहे. प्रश्नपत्रिका काढण्यासाठी बँकेला कोणी मिळालेच नाही का? असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे. साधारणतः कोणत्याही बँकेचे परीक्षा असेल तर त्याची काठीण्यपातळी जास्त असते. प्रश्न संख्या किमान ५० ते कमाल १०० असते. मात्र रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक याला अपवाद ठरली आहे. बँकेने ऑनलाईन परीक्षा सहा गुणांची ठेवली असून त्यासाठी सहा प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे परीक्षा घेणे हे फक्त फॉरमॅलिटी म्हणून असणार आहे की काय असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.
आहे की नाही गंमत ?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लिपिक आणि शिपाई या १७९ पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे हजारो अर्ज आले असून त्यांच्या छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार पात्र झाले त्यांना परीक्षेबाबत फॉर्म भरण्यासाठी लिंक देण्यात आली. त्यावरून फॉर्म भरताना परीक्षेच्या अटी त्यावर टाकण्यात आल्या आहेत. त्यातील अटी पाहिल्या की परीक्षा म्हणजे केवळ टाईमपास आहे की काय ? असे कुणालाही वाटेल. त्यात १ मिनिटांचा ६ गुणांचा ६ प्रश्न असलेला पेपर सोडवला की परीक्षा झाली…आहे की नाही गंमत?
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती प्रक्रिया चर्चेचा विषय ठरत असतो. बँकेच्या कारभाराबाबत अनेकांमध्ये साशंकता आहे. बाहेर खाजगीत ग्राहक बँकेच्या कारभाराबाबत बोलताना दिसत आहेत. या भरतीबाबत आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा सुद्धा केली जात आहे. कोणी म्हणतोय दहा लाख लागतात तर कोणी म्हणतोय १५ लाख लागतात. मात्र कुणीही दहा लाख आणि पंधरा लाख कोणी घेतो याचे सोर्स मात्र सांगत नाही. त्यामुळे एक प्रकारे जनमानसात बँकेची बदनामीच होत आहे. त्यात आता ऑनलाइन परीक्षा सहा गुणांची आणि सहा प्रश्न असलेले ठेवण्यात आल्याने केवळ फॉरमॅलिटी म्हणून परीक्षा घेतात की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आहे म्हटल्यावर स्थानिक भरतीचा टक्का हा 80% असायला हवा. स्थानिकांना किती रोजगार मिळतो हे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळेलच. मात्र त्याआधी सहा गुणांची सहा प्रश्न असलेली ऑनलाइन परीक्षा म्हणजे चेष्टेचा विषय बनला आहे. प्रश्नपत्रिका काढण्यासाठी कोणी तज्ञ व्यक्ती बँकेला मिळाला नाही की बँकेला फक्त परीक्षा घेतली हे कागदोपत्री दाखवण्यासाठी हा सहा गुणांचा पॅटर्न तयार करावा लागलाय? कोणतीही आयबीपीएस परीक्षा हे त्याच्या काठीण्यपातळी आणि तिच्या शंभर गुणांच्या पॅटर्नवर आधारित असते. त्यामुळे बँक भरतीत सहजासहजी कुणालाही नोकरी मिळत नाही. कागदपत्रांची पडताळणी त्यानंतर एक परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि मुलाखत याद्वारे होणारी भरती प्रत्येक फेरी वरती उमेदवाराला सत्वपरीक्षा असते तशी असते. मित्र इथे अर्जाची पडताळणी झाल्यावर एका मिनिटात सहा कोणाची सहा प्रश्न असलेली ऑनलाइन परीक्षा सोडवा आणि मुलाखतीला या आणि मुलाखतीतून मग उमेदवार निवडले जातील, असा पॅटर्न दिसतो. त्यामुळे मुलाखतीतून नोकरी मिळणार असल्यामुळे बाहेर आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा आहे.