रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मंजुरी प्रक्रियेने गती घेतली आहे. रक्षाबंधनापूर्वी बहिणींच्या खात्यात रक्कम पडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ८८ टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली असून, १ लाख ८१ हजार १२० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तसेच १४ हजार ७७ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्याच्या पूर्ततेसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात आल्याचे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.
- दोन लाख २७ हजार ७४८ अर्जाची छाननी
- चौदा हजार ७७ अर्जामध्ये त्रुटी
- बत्तीस हजार ५५५ अर्ज प्रलंबित
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख ९३ हजार ६७६ लाभार्थींची नोंद झाली आहे. १ जुलैपासून जाहीर झालेल्या या योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ३१ जुलैनंतर जिल्ह्यातील २ लाख २७ हजार ७४८ अर्जाची छाननी करण्यात आली. त्यापैकी १ लाख ८१ हजार १२० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या छाननी प्रक्रियेत १४ हजार ७७ अर्जामध्ये त्रुटी असल्याने संबंधित तहसीलदारांकडे हे अर्ज पूर्ततेसाठी रवाना करण्यात आले. ३२ हजार ५५५ अर्ज प्रलंबित आहेत.