रत्नागिरी : प्रतिनिधी
हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आर्जू टेकसोल प्रा. लि. कंपनीच्या संचालकांकडून सव्वा लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यावर रत्नागिरी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे पदाधिकारी अमोल श्रीनाथ, साईश मयेकर, शेखर नलावडे (रा. रत्नागिरी) या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचे पदाधिकारी अमोल श्रीनाथ, साईश मयेकर, शेखर नलावडे यांनी वेळोवेळी कंपनी कार्यालयात येऊन दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याचा व गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच १ लाख २० रुपयाची खंडणी कंपनीच्या लोकांकडून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी अमोल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे यांच्याविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३४ प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा मार्च २०२४ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत आर्जू कंपनीचे फॅक्टरी आउटलेटसमोर कुवारबाव बाजारपेठ येथील रस्त्यावर घडला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अमोल अनिल पाटील (३८, राहणार पंडयेवाडी,मिरजोळे) यांनी फिर्याद दिली.
मनसेची प्रतिमा होतेय मलीन
मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल होत असल्याने मनसेची रत्नागिरी शहरातील प्रतिमा मलीन होत आहे. याआधीही व्याजी धंद्याबाबत फिर्याद दाखल करण्याचे प्रयत्न झाले होते. मनसे हा रस्त्यावर उतरून लोकांची कामे करणारा पक्ष असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. यामागे काही षडयंत्र आहे का? हे तपासण्याची गरज आहे.
या फिर्यादीनुसार, आर्जू कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी बनवलेल्या मालाची विक्री होत नसल्याचे तसेच कंपनीमध्ये काही लोकांचे पेमेंट देणे बाकी राहिल्याने काही लोकांनी काम सोडले. या कंपनीच्या आर्थिक व्यवहारातील अडचणीचा फायदा घेऊन यातील अमोल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे यांनी वेळोवेळी कंपनी कार्यालयाचे दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याचा व गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या दिल्या. या धमक्या कंपनीचे संचालकाना दिल्या. त्यामुळे कंपनीकडून फिर्यादी याच्यामार्फत अमोल पाटील यांनी अमोल श्रीनाथला दिनांक २२ मार्च २०२४ रोजी एक लाख रुपये दिले. फिर्यादी याच्या कंपनीतील गुंतवणूकदाराच्या नावे साईश मयेकर यांनी २० हजार रुपये घेतले. असे एकूण १ लाख २० हजाराची खंडणी वसूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.