रत्नागिरी : प्रतिनिधी
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभा सहप्रभारी, माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केली.
श्री. बाळासाहेब माने यांनी सांगितले, अर्थसंकल्प सादर होणार असल्याने आज सकाळपासून कामकाज पाहत होतो. अर्थसंकल्पातील अनेक नवीन गोष्टी भारताच्या विकासाकडे विशेष लक्ष देणाऱ्या योजना, तरतुदी या खूपच अभ्यासपूर्ण असल्याचे जाणवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रीमंडळाने सादर केलेला हा नव्या सरकारमधील अर्थसंकल्प भारताला प्रगतीपथावर नेणारा आहे, असेच म्हणावे लागेल.
मुद्रा कर्ज योजना योजनेत आता १० लाखांऐवजी २० लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत २७.७५ लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ४७ कोटी छोट्या, मोठ्या उद्योगपतींना याचा लाभ झाला आहे. शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली. तिचा फायदा ८० कोटींहून अधिक लोकांना फायदा झाला आहे, भारतातील जनतेला याचा फायदा मिळणार आहे, असे श्री. बाळासाहेब माने यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या तरतुदींबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मोदी सरकारने कर्करोगाच्या तीन औषधांवरील उत्पादन शुल्क वगळले आहे. नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा सुद्धा महत्त्वाची आहे. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांची आर्थिक मदत ही तरतूदसुद्धा खूपच उपयुक्त ठरणारी आहे.