रत्नागिरी जिल्हाधिकारी आवारात एजंटगिरी जोमात, प्रशासनाचे छुपे सहकार्य?
- कागदपत्रे मिळविण्यासाठी उकळले जाताहेत पैसे
- पैसे देताच दाखले त्वरित मिळण्याची सोय
- रीतसर अर्ज करणाऱ्यांना राहावे लागते ताटकळत
- जिल्हाधिकारी कार्यालयाचे अक्षम्य दुर्लक्ष
- महापुरुषाच्या साक्षीने होताहेत व्यवहार
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हाधिकारी आवारात एजंटगिरी चालत असून एंजट लोकांचा सुळसुळाट आहे. काही लालची सरकारी अधिकारी आणि काही लाचार कर्मचारी यांच्या संगनमताने एजंट लवकरात लवकर दाखले मिळवून देत आहेत. त्यासाठी लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’ अशी म्हण प्रचलित आहे. त्यानुसार रत्नागिरी तहसील, सेतू, पुरवठा विभागाचे काम सुरू आहे. नियमानुसार दाखले काढायला अर्ज दिल्यापासून काही दिवसांची मुदत असते. त्यानुसार इथे दाखले दिले जात असताना काही लाचार कर्मचारी आणि लालची अधिकारी एजंट लोकांच्या सहाय्याने पैसे घेऊन दाखले मुदतीच्या म्हणजे एक दोन दिवसाच्या फरकाने लोकांना देत आहेत. त्यामुळे ‘पैसे घे पण लवकर दे’ अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे. यावर कुणाचाच अंकुश नसल्याने जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.
पैसे द्या…रेशनकार्ड लवकर देतो!
काही एजंट पैसे घेऊन शुभ्र रेशनकार्ड मिळवून देत आहेत. ढीगभर कागदपत्रे एरवी लागतात मात्र पैसे दिले की एक दोन कागदपत्रात रेशनकार्ड मिळवून दिल्याचे उदाहरण आमच्या हाती लागले आहे. या सरकारी खाबुगिरीला लगाम घालण्याचे शिवधनुष्य जिल्हाधिकाऱ्यांना पेलावे लागणार आहे.
गेल्या काही वर्षात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महापुरुष मंदिर, सेतू कार्यालयाबाहेर ही एजंट मंडळी आपले दुकान मांडून बसलेली आहेत. त्यात अनेक राजकीय एजंट पण आहेत. लोकांना हेरून दाखले लवकरात लवकर काढून देतो म्हणून सांगणारे राजकीय एजंट सपडताना मुश्किल आहेत. पण काही खासगी एजंट मात्र राजरोस पैसे घेऊन दाखले झटपट मिळवून देत आहेत. यासाठी काही सरकारी अधिकारी आणि काही कर्मचारी त्यांना सहकार्य करत आहेत. त्यात त्याची टक्केवारी असल्याचे काही खासगी एजंट बोलत असतात. आम्ही पैसे घेतो आणि जलद दाखले मिळवून देतो, अशा वल्गना कोणाच्या जीवावर करतात, याची चौकशी करणार कोण? जबाबदार अधिकाऱ्याच्या सह्या झाल्याशिवाय हे दाखले मिळतात कसे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. की या भ्रष्टाचारात जबाबदार अधिकारीच मिळालेले आहेत? या प्रश्नाबाबत जनतेत संभ्रम आहे.