रत्नागिरी : प्रतिनिधी
गोहत्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास विलंब झाल्याने आक्रमक हिंदुत्वनिष्ठ जनतेने दि. ७ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. हा मोर्चा मारुतीमंदिर इथून सुरू झाला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून मोर्चाला प्रतिबंध केला. त्याशिवाय गोहत्येतील आरोपीविरोधात ठोस पावले उचलण्यास विलंब केल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतरही कारवाईस विलंब झाल्याने संतप्त जमावाने जेलनाका येथे मुख्य रस्ता अडवून धरला. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने ४५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुत्वनिष्ठ चंद्रकांत राऊळ, माजी खास. निलेश राणे, माजी आ. बाळ माने, राकेश नलावडे, नंदकिशोर चव्हाण, राज परमार, स्वरुप पाटील, दत्तात्रय जोशी, पराग तोडणकर, अक्षय चाळके, स्वयंम नायर, संतोष पवार, समर्थ पाटील यांच्यासह ४५० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून रविवारी ७ जुलै रोजी दुपारी ११.३० ते २.३५ या कालावधीत मारुती मंदिर शिवसृष्टी, माळनाका ते जेलरोड असा मोर्चा काढत रास्ता रोको केले होते. प्रशासनाने दिनांक ४ जुलै ते ३० जुलै २०२४ या कालावधीसाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३१ (१) अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.