माचाळ येथील घटना, स्थानिक महिलेची फसवणूक
लांजा : प्रतिनिधी
तालुक्यातील माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या स्थानिक महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे, अशी बतावणी करून २ हजार रुपये उकळणाऱ्या पर्यटकांना येथील ग्रामस्थांनी भरपेट प्रसाद दिल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या घटनेत काही प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने खळबळ उडाली आहे.
लांजा तालुक्यातील माचाळ गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे पर्यटनासाठी खूप गर्दी असते. समुद्रसपाटीपासून उंच असणाऱ्या माचाळला पर्यटकांची मोठी पसंती आहे. शुक्रवारी लांजातील तीन लोक माचाळ येथे आले होते. येथील एका महिलेकडे या तिघांनी जेवणाची ऑर्डर दिली. दुपारी मौजमस्ती झाल्यानंतर जेवण झाले. जेवणाचे बिल मागितले असता या पर्यटकांनी बिल देण्यास नकार दिला.
या पर्यटकांनी तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे. तुम्ही दुसऱ्याकडून वीज घेतले आहे, असे सांगून तुम्हाला वीस हजार रुपये दंड होईल, अशी धमकी दिली. इतक्यावरच न थांबता उलट या महिलेकडून दोन हजार रुपये घेतले. दरम्यान, महिलेला फसवल्याची माहिती माचाळ गावातील ग्रामस्थांना समजली तातडीने ग्रामस्थ जमा झाले. चार चाकी वाहन घेऊन आलेल्या या तिघांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतले आणि फसवणुकीचा जाब विचारला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना भरपेट प्रसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.