राजापूर : प्रतिनिधी
सुमारे दोन वर्षापूर्वी कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्याबाबतचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने इथल्या जनतेला दिले होते. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही न झाल्याने रेल्वेचे आश्वासन हे नेत्यांच्या आश्वासनासारखेच झाले असल्याची प्रतिक्रिया राजापूर तालुक्यातील जनतेतून उमटली आहे.
गेल्या काही वर्षात कोकण रेल्वेमध्ये अनेक बदल झाले आहेत, विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जनतेला अत्याधुनिक सेवा मिळाल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण वेगाने झाले आहे. कोकण रेल्वेत सुधारणा होत असतानाच दुसरीकडे मात्र सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाबाबत गेल्या चार वर्षात सुधारणा झालेल्या नाहीत.सौंदळ येथील हॉल्ट स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहासह खराब बनलेला रस्ता आणि अन्य समस्या अधिकच बिकट बनत असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने दोन वर्षापूर्वी दिलेले आश्वासन
सौंदळ स्थानक हे हॉल्ट स्थानक असून मापदंडानुसार या स्थानकावर प्रवासी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच सध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता गाड्यांना दिलेले थांबे पुरेसे आहेत. निरनिराळ्या सेवा सुविधांमध्ये वाढ करणे ही एक नियमित प्रकिया आहे आणि गरजा तसेच स्टेशन प्राधान्य यानुसार टप्याटप्याने त्यात वाढ केली जाते. त्यामुळे निधी उपलब्धतेनुसार क्रॉसिंग स्थानकासाठीच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करून सौंदळचे हॉल्ट स्थानकातून कॉसिंग स्थानकामध्ये रूपांतरण करण्यात येईल.
कोकण रेल्वे मार्गावर राजापूर बहुतांशी राजापूर तालुक्याला सोयीचे ठरेल अशा सौंदळ येथे थांबा मिळावा, अशी सातत्याने मागणी तालुक्यातून होत होती. तालुकावासीयांच्या सुदैवाने कोकणचे सुपुत्र असलेले सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात रेल्वेत अमुलाग्र बदल घडविले होते. त्यामध्ये सौंदळ हॉल्टला मान्यता दिली होती. वर्षभरातच सौंदळ हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उदघाटन ना. प्रभूंच्या हस्ते पार पडले होते. त्यानंतर गेल्या तीन वर्षात येथे दोन पॅसेंजर थांबत होत्या. कोरोनाच्या काळात दोन्ही पॅसेंजर बंद होत्या. त्यापैकी एक असलेली सावंतवाडी- दिवा ही पॅसेंजर कोरोना संपताच पूर्ववत सुरू झाली. तिला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला. तथापि दुसरी पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही. व्हॉल्ट स्थानक असलेल्या सौंदळचे कायमस्वरुपी स्थानकात रुपांतर करण्यात यावे अशी मागणी गेली काही वर्षे सातत्याने सुरू असून संबंधित कोकण रेल्वे प्रशासनाकडे तसे पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले आले. मात्र यावर आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.