नवीमुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, दि.२६ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ७ ते सायं ६ ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मेच्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, दिनांक. २६ जून रोजी सकाळी ८ ते सायं ४ अशी निश्चित करण्यात आली होती. परंतू आता भारत निवडणूक आयोगाने दिनांक ३ जून रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ५६ नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे. मतदानाची नवीन वेळ बुधवार, दि.२६ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ७ ते सायं ६ ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक २६ जून रोजी पदवीधर व शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.