राजापूर : प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षात राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघात विकासाचा बट्ट्याबोळ झालेला असल्याने त्याची दखल रत्नागिरीच्या ‘शेठ’ने घेतली असून आता या मतदारसंघाच्या विकासाची दारे खुली होतील, असे जनतेतून बोलले जाऊ लागले आहे. नुकतीच राजापूर कोदवली येथील सायबाच्या धरणाची शेठ अर्थात किरण सामंत यांनी पाहणी केली असून सायबाचा प्रश्न आपण सोडविणार असल्याचे वचन राजापूर शहरवासीयांना दिले. त्यामुळे अनेक वर्ष रखडलेल्या ‘सायबा’चा प्रॉब्लेम ” सोडविणार आहे.सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक, शिवसेना नेते किरण सामंत तथा भैय्याशेठ यांनी रविवारी राजापूर कोदवली येथील ब्रिटिश कालीन सायाबाच्या धरणाची पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे, ठेकेदार गदगू जाधव, राजापूर नगर परिषद मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते. सायबाच्या धरणाचे काम रखडल्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे हे एकमेव धरण असून त्या धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अशी शहरवासियांची मागणी आहे. गेल्या वीस वर्षात इथल्या आमदार किंवा खासदारांनी या धरणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे राजापुरातील जनतेला पाणी प्रश्नाबाबत कोणीच वाली राहिलेला नव्हता. शेवटी राजापूरवासियांच्या या प्रश्नासाठी शेठ धावून आले आहेत.सायबाच्या धरणाच्या कामाला अधिकचा निधी कसा मिळावा यासाठी आम्ही विचार विनिमय करू. वेळ पडल्यास अधिकचा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी किरण सामंत यांनी यावेळी दिले. यासाठी आवश्यक ते प्रस्ताव राजापूर नगर परिषदेने पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमच्याकडे सादर करावेत. आम्ही त्यासाठी पूर्णतः पाठपुरावा करू अशी माहिती यावेळी किरण सामंत यांनी दिली. यावेळी धरणासंबंधीच्या अडीअडचणी किरण सामंत यांनी समजून घेतल्या. यावर मार्ग काढण्याचे अभिवचन सामंत यांनी दिले.