रत्नागिरी : प्रतिनिधी
हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते. तिच्या शेणाला आणि मूत्राला पवित्र समजले जाते. त्याचा वापर यज्ञ, पूजा, गृहनिर्माण व जैविक शेती यामध्ये केला जातो. त्याच गोमातेच्या शेणापासून बनवलेली गव्य गणेशमूर्ती ही शुद्ध, सात्विक आणि आध्यात्मिक शक्तीने युक्त मानली जाते. अश्या गव्य गणपती मूर्त्या सध्या रत्नागिरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला साद घालत आहेत.
आजकाल प्लास्टिक ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण ही एक मोठी पर्यावरणीय समस्या बनली आहे. पीओपीच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात लवकर विरघळत नाहीत आणि त्यामुळे जलचर आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. याउलट, गव्य गणपती मूर्ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असतात. त्या देशी गायीच्या पवित्र गोमय (शेण) आणि स्थानिक लाल मातीचा वापर करून बनवल्या जातात. नैसर्गिक घटकांपासून बनवल्यामुळे, या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात सहज विरघळून जातात आणि पर्यावरणावर कोणताही दुष्परिणाम करत नाहीत.
गायीच्या शेणापासून बनवलेल्या गव्य गणपती मूर्तीमुळे केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारला जात नाही, तर त्यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. पारंपरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अनेकजण गव्य गणपतीला पसंती देत आहेत. त्यामुळे गोशाळा, शेतकरी, ग्रामीण महिला गट, आणि युवकांसाठी हे मूळ भारतीय तत्त्वज्ञान रोजगाराचे साधन ठरत आहे. या मूर्तींची मागणी वर्षागणिक वाढत असल्याने ग्रामीण भागात स्वयंसहायता महिला गट, गोशाळा कर्मचारी, युवक संघटनांमध्ये मूर्ती बनवण्याचा लघुउद्योग आकार घेऊ शकतात.
गणेशोत्सव तोंडावर असताना, पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी येथे गव्य गणेश या पूर्णतः पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचे प्रदर्शन सुरु झाले आहे. या प्रदर्शनात उपलब्ध असलेल्या गव्य गणपती मूर्ती अत्यंत आकर्षक आणि मजबूत आहेत. त्या वजनाने हलक्या असल्याने एका व्यक्तीलाही सहज हलवता येतात. ६ इंचपासून ३ फुटांपर्यंतच्या अनेक आकर्षक डिझाईन्समध्ये या मूर्ती एस. पी. अलेक्सा बिल्डिंग, महिंद्रा शोरूम समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे उपलब्ध आहेत.
पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा गव्य गणपती ग्रामीण भागातील एक पारंपरिक आणि नैसर्गिक पर्याय ठरतो आहे. गायीचे शेण, माती आणि पाण्याचे मिश्रण करून ही मूर्ती तयार केली जाते. सर्वप्रथम हे मिश्रण घट्ट मळून त्याचा साचा बनवला जातो. मूर्ती पायथ्यापासून डोक्यापर्यंत हळूहळू आकार घेत जाते. सोंड, डोळे, कान, मुकुट, आणि आशीर्वाद मुद्रा यांसारख्या बारकाव्यांसह मूर्ती साकार होते. रंग वापरले जात नाहीत, तर फुलं, पानं, हळद-कुंकू यांचा उपयोग होतो. ही मूर्ती विघ्नहर्त्याच्या पूजनासोबतच मातृभूमीशी, शेतीशी, आणि गोमातेशी असलेलं नातं अधोरेखित करते. अशा मूर्तीमुळे ग्रामीण संस्कृती, नैसर्गिकता आणि पारंपरिक मूल्य जपली जातात.
शास्त्रांनुसार, कोणतीही मूर्ती सात्विक घटकांपासून बनवली गेल्यास तिची पूजा अधिक फलदायी ठरते. शेण हे निसर्गनिर्मित आणि विघटनशील असल्यामुळे गव्य गणपती मूर्ती ही पर्यावरण रक्षणाचे प्रतीक बनली आहे. विसर्जनानंतर या मूर्तींचे पाणी प्रदूषण होत नाही, उलट त्या खतामध्ये रूपांतरित होतात. गव्य गणपतीची मूर्ती ही एकाच वेळी देवत्व, मातृत्व आणि निसर्गसंवर्धनाचे त्रिसूत्री प्रतीक ठरते. श्रद्धेच्या मूळाशी जोडलेली ही कल्पना भविष्यकाळातील गणेशोत्सवासाठी आदर्श ठरू शकते. अशा मूर्तींचा स्वीकार म्हणजे धर्म, पर्यावरण आणि समाज यांच्यात समतोल साधणारी शाश्वत दिशा आहे.
गव्य गणपती पहा खालील लिंकवर क्लिक करून…




