रत्नागिरी : प्रतिनिधी
दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिल्याची पुस्तिका जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी न्यायमूर्ती जामदार यांना सुपूर्द केली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे फीत कापून न्यायमूर्ती श्री. जामदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश सुनिल गोसावी, जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश निखिल गोसावी, तालुका वकील संघाचे अध्यक्ष वकील विजयसिंह पवार, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पहाणी करुन सविस्तर माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. यानंतर झालेल्या प्रमुख कार्यक्रमात ते म्हणाले, न्याय व्यवस्था आणि प्रशासन यांनी प्रगती केलेल्या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती हे पद मिळाले. हा जिल्हा विचारवंतांचा, बुध्दिवंतांचा, त्याग करणाऱ्यांचा आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे, ही न्यायाची व्यापक संकल्पना आहे. भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत, ते सर्वच नागरिकांना मिळाले पाहिजेत. सामाजिक न्याय तत्वांचा अंगीकार केलेला आहे. संविधानात अपेक्षीत असणारा न्याय राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समान संधी मिळण्याचा असा सर्वसमावेशक आहे. नागरिकांना जगण्याचा अधिकार आहेच, पण घटनेने तो अधोरेखित केलेला आहे. जीवन प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे.