रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील पऱ्याच्या आळी भागात एका धावत्या दुचाकीवर विद्युत खांब अचानक कोसळून दुचाकीवरून जाणारी जयगड येथील दोघं गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत
भाग्यश्री प्रकाश पावरी (१८) तसेच अजय संतोष शिंदे (२९, दोघंही रा. जयगड, रत्नागिरी ) अशी विजेचा पोल पडून जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या संदर्भातील अधिक माहितीनुसार मंगळवारी रात्री अजय शिंदे दुचाकीवरून भाग्यश्री पावरी हिला मागे बसवून पऱ्याची आळी येथून जात होता. त्याच सुमारास तेथील गंजलेला पोल त्यांच्या चालत्या दुचाकीवर पडून हा अपघात झाला.
या घटनेत दोन्ही गंभीर जखमिंवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा पोल पडल्यामुळे शहरातील काही भागातला विजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पडलेला पोल बाजूला करत एक तासानंतर विजपुरवठा पूर्ववत केला.