चिपळूण : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, नोकरदार वर्गाची बँक असताना या बँकेतून जिल्हाबाहेरील उद्योजकांना ५६५ कोटींचे कर्ज कसे दिले गेले? तोट्यात चालणारी बँक सरकारकडून कर्जमाफीचे १६५ कोटी मिळवून नफ्यात आणली. खातेदार व सभासदांनी विश्वास ठेवून सहकार्य केले आणि त्याच शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना इंटरनेटचे कारण पुढे करून मागे ठेवणार असाल तर हा गौडबंगाल सहन करणार नाही. सर्वकाही उघड करेन, अश्या शब्दात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी थेट वर्मावरच बोट ठेवला आहे.
बँकेच्या कारभाराबाबत प्रश्न
बँकेत २०० जागांसाठी जिल्हा बँकेत नोकर भरती आहे.मग त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय संचालक मंडळाचा की राज्याच्या सहकार विभागाचा होता?तसा जीआर निघाला होता का?तसेच ऑनलाइन परीक्षेसाठी एजन्सीज कोणी नियुक्त केली?संचालक मंडळाने की सहकार खात्याने? या प्रशांची उत्तरे सर्वप्रथम जिल्ह्यातील जनतेला मिळायलाच हवी आणि मी ते मागणारच, प्रथम अर्ज भरण्यासाठी प्रत्येकी १००० रुपये घेतले गेले ते कोणाच्या आदेशाने? त्याला जबाबदार कोण? ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांचे पैसे परत करणार का? परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचा खर्च कोण देणार आहे? असे अनेक प्रश्न देखील संदीप सावंत यांनी उपस्थित केले आहेत. बँकेतून निवृत्त झालेले एम.डी.चव्हाण सारखे अनेक अधिकारी मुदतवाढ घेऊन बँकेत त्याच पदावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी का करत आहेत? का जिल्ह्यात योग्य तरुण नाहीत का? फक्त आपल्या समोर हांजीहांजी करणारे मर्जीतल्या लोकांना सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू आहे की काय?
घरडा कॉलेजमध्ये इंटरनेटचे कारण पुढे करून परीक्षा रद्द करण्यात आली. त्याठिकाणी गोंधळ उडाल्यानंतर जिल्हा बँकेचे अधिकारी काही वेळेत तिथे पोहचले, याचा अर्थ काय होतो? त्यांना हे माहिती होते की काय?दबा धरून त्याठिकाणी बसले होते का? हा चक्क स्थानिकांना पद्धतशीर बाहेर करण्याचा डाव असून तो डाव आम्ही हाणून पडल्याशिवाय गप्प बसणार नाही. २०० नोकर भरती आहे आणि ते जिल्ह्यातील स्थानिकच हवे आहेत. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात जनआंदोलन उभे करून संबंधित यंत्रणेला सळोकीपळो करून ठेवू असा थेट इशारा देखील संदीप सावंत यांनी दिला आहे.
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तसेच सहकार मंत्री यांना पत्र व्यवहार करणार असून त्यांनी दुर्लक्ष केल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष थेट जिल्हाभरात रस्त्यावर उतरले मग सर्व जबाबदार संबंधित यंत्रणेची असेल,अश्या रोखठोक शब्दात संदीप सावंत यांनी भूमिका स्पष्ट करून जणू एल्गारच पुकारला आहे.त्यामुळे जिल्हा बँक नोकर भरतीचा विषय आता चांगलाच गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.