राजापूर : प्रतिनिधी
राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशा बाबत अनेक वेळा तक्रारी करुनही व प्रांताधिकारी यानी दिलेल्या आदेशान्वये अद्यापही या मदरशावर कारवाई करुन तो बंद न केल्याने धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थानी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबबतचे निवेदन धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थ अमोल सोगम यांनी प्रशासनाला दिले आहे.
गेली दोन वर्ष राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथे अनधिकृतपणे सुरु असणारा मदरसा तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी वेळोवेळी प्रशासनाकडे केलेली असताना अद्यापही हा मदरसा बंद न केल्याने आता येथील ग्रामस्थानी आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे. या अगोदर या मदरशा विरोधात येथील ग्रामस्थानी २६ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत धोपेश्वर कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. मात्र प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले होते त्यानंतर प्रांताधिकारी राजापूर यानी येथील ग्रामस्थांसहीत मदरशाचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी या बैठकित प्रांताधिकारी राजापूर यानी हा मदरशा त्वरीत बंद करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती अमोल सोगम यानी दिली आहे. मात्र त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षातही हा मदरसा राजरोसपणे सुरु आहे. प्रांताधिकारी राजापूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे सांगत आता १५ ऑगस्ट २०२४ म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासुन या मदरशाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थानी दिला आहे.