रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी नजिक मिरजोळे एमआयडीसी येथे गुरुवारी संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडले आणि रत्नागिरीत खळबळ उडाली. या प्रकारानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. हा रत्नागिरीतील हा सगळा प्रकार थांबला पाहिजे नाहीतर गो रक्षणासाठी कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 44 वर गुरुवारी संध्याकाळी गोवंशाचे एक मुंडके रस्त्यावर पडलेले दिसून आले. त्यानंतर रत्नागिरीतील हिंदू बांधव आक्रमक झाले. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत अशी मागणी करत शुक्रवारी पहाटेपर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते. या सगळ्या प्रकारची दखल आता भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनीही घेतली आहे. याबाबतची प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. निलेश राणे म्हणाले मिरजोळे येथे झालेला हा प्रकार मनाला वेदना देणार आहे, रत्नागिरीमध्ये हे प्रकार गेली अनेक वर्ष सुरू आहेत. एक मुंडके रस्त्यावर पडलेले दिसले म्हणजे असे अन्य गोवंशाचे अवयव त्या गाडीत असण्याची शक्यता आहे. हे सगळं जर प्रशासनाला माहिती आहे तर त्यावर कारवाई का होत नाही, पोलिसांना सगळे मार्ग माहिती आहेत, हे प्रकार कोण करत माहिती आहे, मग इतके दिवस हे प्रकार थांबवले का जात नाहीत. त्यावर कारवाई का होत नाही असा सवाल निलेश राणे उपस्थित केला.
जर या आठवडा – दहा दिवसात हे प्रकार थांबवले नाहीत तर गाड्या आम्ही थांबवणार, त्या फोडणार आणि जिथे ही कत्तल चालते ते स्पॉट आम्ही उध्वस्त करणार. पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई केली नाही तर गो मातेच्या रक्षणासाठी आम्ही कायदा हातात घेणार असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.तर घटना घडल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून रत्नागिरीतल्या गोरक्षकानी, हिंदू प्रेमींनी हा विषय लावून धरला याबद्दल निलेश राणे यांनी या सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक सुद्धा केले आहे. मीही या सगळ्यांसोबत असल्याची ग्वाही त्यांनी आपल्या व्हिडिओतून दिली आहे.