रत्नागिरी शहराच्या कारभाराकडे पाहून मिळतील उत्तरे
रत्नागिरी : प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षात रत्नागिरी शहरातील रस्ते, पाणी, गटार समस्या कायम असून विकासाच्या वल्गना करणाऱ्या लोकप्रतिनिधीबाबत नाराजीचा सूर आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोट्यवधींचा निधी शहराला गेल्या वीस वर्षात दिल्याचा दावा ते खुद्द करतात. मात्र तो कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही शहरातील रस्ते, पाणी समस्या कायम आहेत. त्यामुळे निधी कुठे जिरतो? पाणी कुठे मुरते? आणि विकास कसा मरतो? याची उत्तरे रत्नागिरी शहराकडे पाहून मिळतात.
शहरातील प्रभाग २ मधील बोर्डिंग रोडवर विकास ओसंडून वाहत आहे. नवीन झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी पाणी साचत आहे. गटार व्यवस्था नाही. जिथे गटार व्यवस्था आहे तिथे पाणी निचरा होण्याची सोय ठेकेदारांनी ठेवलेली नाही. या प्रभागात शिवसेना नगरसेवक होते. मात्र या नगरसेवकांनी इथल्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाही. पाण्याची समस्या तर संपूर्ण शहराला होती. रस्ते आणि गटार बांधकामे यांच्या काळात जर झाली तर गटारात पाणी जाण्याची सोय न ठेवणाऱ्या ठेकेदारांना जाब माजी नगरसेवकांनी कितींदा विचारला? आणि विचारला असेल तर कामं निकृष्ट का झाली? याचे उत्तर नसल्याने पाणी कुठे मुरते याचा अंदाज येईल. पाणी मुरल्याने निधी कसा जिरतो हे वेगळे सांगायला नको. पाणी मुरल्याने आणि निधी जिरल्याने विकास मरतो हे पाहायला मिळत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी शहरातील नव्याने केलेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, गटारातून न वाहणारे सांडपाणी, रस्त्यांची लेव्हल नसल्याने साचणारी डबकी, सातत्याने फुटणारी पाणीलाईन, उद्यानातून गायब झालेली झाडे, उद्यानातून गायब झालेली खेळणी, बंद पडणारे पथदिप, तेच तेच ठेकेदार, त्यांच्या नावावर काम घेणारे नगरसेवकांचे नातेवाईक, त्यांच्या पाठीशी असणारे मंत्री यामुळे विकास मरत आहे. आता हा मेलेला विकास फक्त निवडणूक आली की जिवंत होतो. त्यामुळे जनतेने येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मारेकऱ्याचे श्राद्ध घालायला हवे. अन्यथा कायम निधी कुठेतरी जिरणार? पाणी कुठेतरी मुरणार? आणि विकास मरणार आणि आपल्याला समजणार पण नाही!